चेंबूर येथील आचार्य महाविद्यालयात जीन्‍स आणि टी शर्ट यांवर बंदी !

धर्म दर्शवला जाणारा पोशाख परिधान करण्‍यास बंदी !

प्रतिकात्मक छायाचित्र : जीन्‍स आणि टी शर्ट यांवर बंदी

मुंबई – चेंबूर येथील आचार्य महाविद्यालयात जीन्‍स आणि टी शर्ट यांवरही बंदी घालण्‍यात आली आहे. त्‍यामुळे महाविद्यालयात जीन्‍स आणि टी शर्ट घालून येणार्‍या विद्यार्थ्‍यांना अडवण्‍यात आले. याआधी २६ जून या दिवशी ‘आचार्य महाविद्यालयाने घातलेली हिजाबबंदी योग्‍य आहे’, असा निर्णय मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिला होता.

‘महाविद्यालयाच्‍या ‘ड्रेसकोड’नुसार (वस्‍त्रसंहितेनुसार) फाटक्‍या जीन्‍स, टी शर्ट, अंगप्रदर्शन करणारे कपडे, जर्सी यांना मनाई करण्‍यात आली आहे. हाफ शर्ट, फुल शर्ट आणि पँट घालण्‍यास मनाई नाही. विद्यार्थिनी कोणताही भारतीय पोशाख वापरू शकतात. ज्‍या पोशाखातून धर्म दर्शवला जाईल, असा एकही पोशाख कुणीही परिधान करू नये. मुलींनी जर बुरखा, नकाब, टोपी, स्‍टोल असे काहीही परिधान केले, तर ते कॉमन रुममध्‍ये जाऊन काढून टाकण्‍यात येईल. महाविद्यालयाने याविषयी नोटीस काढली असून त्‍यावर प्राचार्यांची स्‍वाक्षरीही आहे.

‘गोवंडी सिटिझन्‍स असोसिएशन’चे अतीक खान म्‍हणाले, ‘‘जीन्‍स-टी शर्ट हे काही विशिष्‍ट धर्माचे लोक घालत नाहीत. सगळ्‍याच धर्माचे लोक या प्रकारचा पोशाख करतात. त्‍यामुळे त्‍यावर बंदी घालणे अव्‍यवहार्य आहे. ड्रेसकोडच्‍या नावाखाली जीन्‍स-टी शर्ट घालण्‍यावर बंदी लादली जात आहे.’’

विद्यार्थ्‍यांनी सभ्‍य दिसतील, असेच कपडे घालावेत ! – प्राचार्य डॉ. लेले, आचार्य महाविद्यालय

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लेले म्‍हणाले, ‘‘विद्यार्थ्‍यांना आम्‍ही कॉर्पोरेट जगतासाठी सिद्ध करत आहोत. त्‍यामुळे त्‍यांनी सभ्‍य दिसतील, असे कपडे घालावेत, अशी आमची इच्‍छा आहे. आम्‍ही त्‍यांच्‍यावर कुठलाही गणवेश लादलेला नाही. केवळ त्‍यांना ‘फॉर्मल्‍स’ (सुसंस्‍कृतपणा दाखवणारा अनौपचारिक पोशाख) घालण्‍यास सांगितले आहे. महाविद्यालयीन आयुष्‍यानंतर जेव्‍हा ते नोकरीसाठी जातील, तेव्‍हा त्‍यांना असेच कपडे परिधान करावे लागणार आहेत.

प्रवेशाच्‍या वेळीच आम्‍ही ड्रेसकोडची माहिती विद्यार्थ्‍यांना दिली होती; पण आता ते याविषयी प्रश्‍न विचारत आहेत किंवा चिंता व्‍यक्‍त करत आहेत, हे कसे ? वर्षाच्‍या ३६५ दिवसांपैकी १२० ते १३० दिवस विद्यार्थी महाविद्यालयात येतात. या दिवसांमध्‍ये त्‍यांना ड्रेसकोडचे पालन करण्‍यात काय अडचण आहे ?’’

संपादकीय भूमिका

  • पाश्‍चात्त्यांपेक्षा भारतीय पद्धतीची वेशभूषा परिधान करण्‍याचा स्‍तुत्‍य निर्णय घेणार्‍या आचार्य महाविद्यालयाचे अभिनंदन ! सर्वच महाविद्यालयांनी यातून बोध घेऊन गणवेशासाठी भारतीय वेशभूषेचा स्‍वीकार करावा !