सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर सौ. संगीता लोटलीकर (वय ६४ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

सौ. संगीता लोटलीकर यांचा साधनाप्रवास ….

सौ. संगीता लोटलीकर

१. सनातन संस्थेशी परिचय आणि साधनेला आरंभ

१ अ. सनातन संस्थेशी झालेला परिचय : ‘आम्ही कुटुंबीय प्रत्येक वर्षी श्री गणेशचतुर्थीला रत्नागिरी जिल्ह्यातील आमच्या मोगरे या गावी जायचो आणि श्री गणेशचतुर्थी झाल्यावर रत्नागिरीला माझ्या भावाकडे (श्री. पुरुषोत्तम वागळे यांच्याकडे) जाऊन डोंबिवलीला परत यायचो. वर्ष १९९४ मध्ये माझा भाऊ सनातन संस्थेच्या सत्संगाला जाऊ लागला होता. तिथे त्याला कुलदेवीच्या नामजपाविषयी कळले. त्याने आम्हाला सनातन संस्थेविषयी आणि ‘कुलदेवीचा नामजप कसा करायचा ?’, हे सांगितले.

१ आ. ‘यजमानांना बरे वाटावे’, यासाठी भावाने कुलदेवीचे नामस्मरण करण्यास सांगणे : माझे यजमान श्री. विजय लोटलीकर (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) पुष्कळ वेळा रुग्णाईत असायचे. त्यांच्यावर आधुनिक वैद्यांचे उपचार चालू होते. माझा भाऊ माझ्या यजमानांना म्हणाला, ‘‘भावोजी, तुम्ही इतर सर्व उपाय करतच आहात. आता कुलदेवीचा नामजप करून पहा.’’ आमचा कुलदेव देव रामनाथ आणि कुलदेवी श्री कामाक्षी (सातेरी) देवी आहे. त्यामुळे ‘नामजप कुठला आणि कसा करायचा ?’, हे लक्षात न येऊन आम्ही ‘श्रीरामनाथाय कामाक्षी देव्यै नमः।’, असा नामजप करायला आरंभ केला.

१ इ. भावाने यजमानांना सनातनच्या सत्संग सोहळ्याला नेणे; पण यजमान तिथे फार वेळ न थांबणे : माझ्या भावाने आम्हाला सांगितले, ‘‘मानखुर्दला सत्संग सोहळा आहे. आपण तिथे जाऊन येऊ.’’ तो यजमानांना घेऊन मानखुर्द येथे गेला. तिथे त्यांना श्री. शिवाजी वटकर (आताचे सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर) आणि अन्य बरेच साधक भेटले. सोहळ्यात थोडा वेळ थांबल्यावर यजमान भावाला म्हणाले, ‘‘केवळ असे अनुभवकथनच असणार आहे का ? फार वेळ थांबायला मला जमणार नाही. आपण निघूया का ?’’  तेव्हा भावाने डोंबिवलीच्या श्री. तनपुरे यांची यजमानांशी भेट करून दिली. श्री. तनपुरे यांनी यजमानांना डोंबिवलीतील २ सत्संगांचे पत्ते दिले.

१ ई. सत्संगाला जायला आरंभ झाल्यावर कुलदेवीचा नामजप योग्य प्रकारे केला जाऊ लागणे आणि लगेच अनुभूती येणे : श्री. तनपुरे यांनी दिलेला सत्संगाचा एक पत्ता आमच्या घरापासून केवळ ५ मिनिटांच्या अंतरावरचा होता. तरीही आम्ही १ – २ आठवड्यांनंतर सत्संगाला गेलो. सत्संगाला गेल्यावर तनपुरेकाकांनी मला आणि यजमानांना ‘‘नामजप कुठला आणि कसा करता ?’’, असे विचारले. आम्ही त्यांना ते सांगितल्यावर ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुमच्या कुलदेवीचा ‘श्री कामाक्षीदेव्यै नमः ।’, असा नामजप करा.’’  ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचेही महत्त्व कळले. आम्ही तोही नामजप करायला आरंभ केला.

१ उ. नामजप आणि सत्संग चालू झाल्यापासून १५ दिवसांत यजमानांच्या दम्याचा त्रास उणावणे : सत्संग आणि नामजप यांचा आम्हाला लाभ झाला. पहिल्या १५ दिवसांतच आम्हाला अनुभूती आल्या. आम्ही सत्संगाला जाऊ लागण्यापूर्वी यजमानांना वारंवार दम्याचा त्रास होत असे. दम्याचा त्रास चालू झाल्यावर त्यांना एकाच दिवशी ७ इंजेक्शने घ्यावी लागायची. आधुनिक वैद्य घरी येऊन त्यांना इंजेक्शन देत असत. योग्य पद्धतीने नामजप चालू केल्यावर केवळ १५ दिवसांतच यजमानांच्या त्रासाची तीव्रता हळूहळू न्यून होऊ लागली.

१ ऊ. सत्संगाची ओढ वाढणे : सत्संगाला जायला लागल्यानंतर आम्हाला सत्संगाची एवढी ओढ लागली की, अजून एका सत्संगाचा पत्ता घेऊन आम्ही त्या सत्संगालाही जायला लागलो.

२. अभ्यासवर्ग

२ अ. अभ्यासवर्गात सेवेचे महत्त्व सांगितले जाणे : यजमान सनातन संस्थेकडून घेतल्या जाणार्‍या अध्यात्मावरील अभ्यासवर्गांनाही जायला लागले. ते घरी आल्यावर मला ‘वर्गात काय शिकवले ?’, ते सांगायचे.

२ आ. अभ्यासवर्गासाठी खाऊ देणे : अभ्यासवर्ग सकाळपासून संध्याकाळपर्यंत असायचा. अभ्यासवर्गाला येणारे सर्वच जण जेवणाचे डबे घेऊन येत असत. मी आमच्या पोळी-भाजी केंद्रातून काहीतरी खाऊ करून देत असे.

( क्रमश: )

याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/810799.html