पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत राहुल गांधी यांना फटकारत विचारला प्रश्न !
नवी देहली – आज हिंदूंवर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही गंभीर गोष्ट आहे. ‘हिंदू हिंसक आहेत’, असे तुम्ही म्हटले होते. ही तुमची मूल्ये आहेत ? हे तुमचे चारित्र्य, तुमची विचारसरणी, तुमचा द्वेष आहे का ? या देशातील हिंदूंसमवेत अशी कृती ? हा देश शतकानुशतके हे विसरणार नाही. सभागृहातील कालचे दृश्य पाहून हिंदु समाजालाही विचार करावा लागेल की, हे अवमानकारक विधान हा योगायोग आहे कि षड्यंत्र ?, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षानेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देत प्रश्न उपस्थित केला.
१ जुलै या दिवशी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलतांना राहुल गांधी यांनी ‘जे स्वतःला हिंदू म्हणवतात, ते २४ घंटे हिंसाचार करतात’ असे विधान केले होते. तसेच भाजप सरकारवर प्रचंड टीका केली होती. त्याला २ जुलै या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिले.
हा देश कधीही क्षमा करणार नाही !
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी हिंदूंमधील सत्तेची परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. हा देश सत्तेची पूजा करतो आणि तुम्ही ती शक्ती नष्ट करण्याचे बोलता ? काही दिवसांपूर्वी या लोकांनी ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द वापरण्याचा प्रयत्न केला होता. या लोकांनी हिंदु धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया यांच्याशी केली आहे. हा देश यांना कधीही क्षमा करणार नाही.
देवाचे प्रत्येक रूप दर्शनासाठी आहे, प्रदर्शनासाठी नाही !
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणाच्या वेळी भगवान शिवाचे चित्र दाखवले होते. त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भगवंताचे प्रत्येक रूप दर्शनासाठी आहे, प्रदर्शनासाठी नाही. वैयक्तिक लाभासाठी देवाची प्रतिमा प्रदर्शित करण्यात आली.
आम्ही लांगूलचालनाचा नाही, तर समाधानाचा विचार करतो !
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या देशाने दीर्घकाळ लांगूलचालनाचे राजकारण पाहिले आहे. जेव्हा आपण समाधानाविषयी बोलतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की, लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचावा. यामुळेच देशातील जनतेने आम्हाला तिसर्यांदा निवडून दिले आहे.