बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणी नागपूरच्या माजी भूमी अभिलेखाच्या उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा नोंद !

पुणे –  बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी नागपूर भूमी अभिलेखाचे तत्कालीन सेवानिवृत्त उपसंचालक दादाभाऊ तळपे यांच्यासह त्यांच्या पत्नी कल्पना तळपे यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून २९ जूनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे एसीबीचे (लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे) पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.

आरोपी दादाभाऊ तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेविषयी पुणे एसीबी कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली होती; मात्र तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेविषयी उपयुक्त पुरावे ते सादर करू शकले नाहीत. त्यांनी भूमी अभिलेख विभागात कार्यरत असतांना स्वत:च्या कार्यकाळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे २८ लाख ५२ सहस्र ५४१ (ज्ञात उत्पन्नापेक्षा १८.७४ टक्के) किमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. बेहिशेबी मालमत्ता संपादित करण्यासाठी दादाभाऊ तळपे यांना त्यांची पत्नी कल्पना तळपे यांनी गुन्हा करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे पुणे एसीबीने दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. (भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करण्यासह त्यांच्या कुटुंबियांनीही भ्रष्टाचारात सहभागी होण्याविषयी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)