परळ आणि मालाड येथे ३ सहस्र रुपयांत पारपत्र दिल्याप्रकरणी १४ अधिकार्‍यांसह ३२ जणांविरोधात गुन्हे नोंद

सीबीआयकडून ३३ ठिकाणी शोधमोहीम !

मुंबई – मालाड आणि लोअर परळ येथील पारपत्र मिळण्याच्या केंद्रातून २ ते ३ सहस्र रुपयांमध्ये अधिकारी पारपत्र देत आहेत. सीबीआयच्या अधिकार्‍यांसह दक्षता विभागाचे अधिकारी आणि विभागीय पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी यांनी २६ जूनला परळ आणि मालाड येथील पासपोर्ट केंद्रांची पडताळणी केली. त्यातून ही माहिती उघड झाली. या संपूर्ण प्रकरणात अधिकार्‍यांनी स्वतःचा सहस्रो, तसेच लाखो रुपयांचा लाभ करवून घेतल्याचे समजते. संबंधित अधिकार्‍यांनी दलालांकडून मित्र, पत्नी, तसेच अन्य नातेवाईक यांच्या खात्यावर पैसे घेतले आहेत. सीबीआयने येथील १४ पासपोर्ट अधिकार्‍यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १२ गुन्हे नोंदवले आहेत.

१. पारपत्र सेवाकेंद्रांवरील पारपत्र साहाय्यक आणि दलाल यांच्याशी संबंधित नाशिक आणि मुंबई येथील ३३ ठिकाणी सीबीआयने शोधमोहीम राबवून महत्त्वपूर्ण कागदपत्रे हस्तगत केली आहेत. संबंधित पासपोर्ट अधिकारी दलालांशी हातमिळवणी करून गैरव्यवहार करत असल्याचा आरोप आहे. पुरेशी कागदपत्रे नसतांनाही किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे ते दलालांच्या ग्राहकांना पारपत्र देतात.

२. संशयित अधिकार्‍यांचे कार्यालय आणि भ्रमणभाष यांची पडताळणी करण्यात आली. कार्यालयातील कागदपत्रे, सामाजिक प्रसारमाध्यमे यांवरील संदेश आणि ‘यूपीआय’वरील आर्थिक व्यवहार यांचीही यात पडताळणी करण्यात आली. त्यात संबंधित अधिकार्‍यांनी दलालांशी काही व्यवहारही केल्याचे आढळले. यात लोअर परळ कार्यालयातील सर्वाधिक अधिकार्‍यांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

या प्रकरणातील संबंधितांना कठोर शिक्षा करून त्यांच्याकडून पैसे वसूल करून घ्यायला हवेत !