Partition of Kerala : केरळची फाळणी करून स्‍वतंत्र ‘मलबार’ राज्‍य निर्माण करण्‍याची मुसलमान संघटनेची मागणी

मुस्‍तफा मुंडुपारा

थिरूवनंतरपूरम् (केरळ) – केरळ राज्‍याचे नाव पालटून ‘केरळम्’ करण्‍याच्‍या मागणीवर राज्‍यातील ‘सुन्‍नी युवाजन संगम’ संघटनेचे नेते मुस्‍तफा मुंडुपारा यांनी स्‍वतंत्र  मलबार राज्‍याची मागणी केली आहे. मलबारमधील शाळांमधील जागांच्‍या कमतरतेवर आयोजित केलेल्‍या निदर्शनांच्‍या वेळी मुस्‍तफा बोलत होते.

मुस्‍तफा म्‍हणाले की, जेव्‍हा आम्‍ही दक्षिण केरळ आणि मलबार यांमध्‍ये असा अन्‍याय पहातो आणि त्‍यानंतर कुणी वेगळ्‍या मलबार राज्‍याची मागणी करत असेल, तर आम्‍ही त्‍यांना दोष देऊ शकत नाही. मलबारमधील लोक आणि दक्षिण केरळमधील लोक समान कर भरत आहेत. आम्‍हालाही समान सुविधा मिळाल्‍या पाहिजेत. या मागणीला फुटीरतावाद म्‍हणण्‍यात अर्थ नाही.

भाजपची टीका

मुस्‍तफा मुंडुपारा यांच्‍या भाषणानंतर त्‍यांच्‍यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्‍यामुळे केरळ भाजपचे प्रमुख के. सुरेंद्र यांनी मुख्‍यमंत्री पिनराई विजयन् आणि विरोधी पक्षनेते सतीशन् यांच्‍यावर टीका केली. ते म्‍हणाले की, पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातल्‍याने केरळमधील कट्टरतावादी शक्‍ती नष्‍ट झाल्‍या, असे ज्‍यांना वाटते, ते चुकीचे आहेत. वेगळ्‍या राज्‍याची मागणी हा उद्धटपणा असून या सूत्रावर पिनाराई विजयन् आणि सतीशन् यांनी मौन बाळगल्‍याने राज्‍यातील काँग्रेस आणि कम्‍युनिस्‍ट या पक्षांनी गुडघे टेकले असल्‍याचे दिसून येते. मतांसाठी ते निर्लज्‍जपणे राष्‍ट्रीय अखंडतेशी तडजोड करत आहेत.

वर्ष २०२१ मध्‍येही स्‍वतंत्र ‘मलबार’ची झाली होती मागणी !

मलबारला केरळपासून वेगळे करण्‍याची मागणी होण्‍याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ‘केरळ सुन्‍नी स्‍टुडंट फेडरेशन’ने वर्ष २०२१ मध्‍ये अशी मागणी केली होती. या संघटनेचे मुखपत्र ‘सत्‍यधारा’चे संपादक अन्‍वर सादिक फैसी यांनी मलबार प्रदेशातील मुसलमानबहुल भाग केरळपासून वेगळे करून ‘मलबार’ हे नवीन राज्‍य निर्माण करण्‍याची मागणी केली होती.

मुस्‍तफा यांनी ज्‍या मलबार प्रदेशाला वेगळे राज्‍य म्‍हणून घोषित करण्‍याची मागणी

केली आहे त्‍यात त्रिशूर, पलक्‍कड, मलप्‍पूरम्, कोळीकोड, वायनाड, कन्‍नूर आणि कासारगोड या भागांचा समावेश आहे. वर्ष २०११ च्‍या जनगणनेच्‍या आकडेवारीनुसार, त्रिशूरमध्‍ये मुसलमानांची लोकसंख्‍या १७.०७ टक्‍के, पलक्‍कडमध्‍ये २७.९६ टक्‍के, मलप्‍पूरम्‌मध्‍ये ७०.२४ टक्‍के, कोळीकोडमध्‍ये ३७.६६ टक्‍के, वायनाडमध्‍ये २८.६५ टक्‍के कन्‍नूरमध्‍ये २९.४३ टक्‍के आणि कासारगोडमध्‍ये ३७.२४ टक्‍के आहे.

संपादकीय भूमिका 

उद्या अस राज्‍य स्‍थापन झाले, तर ही संघटना मलबारला स्‍वतंत्र देश घोषित करण्‍याचीही मागणी करील !