पुणे – मुंबई ते पुणे प्रवास करणार्या नागरिकांची संख्या अधिक असून अनेक नोकरदार नोकरीनिमित्त मुंबई येथे रहातात आणि आठवड्याच्या अखेरीस पुणे येथे येऊन सोमवारी सकाळी मुंबईला कामावर जातात. अशा प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने स्वारगेट ते मंत्रालय अशी शिवनेरी बस चालू केली आहे. ही शिवनेरी बस प्रत्येक सोमवारी सकाळी ६ वाजता स्वारगेट येथून सुटेल आणि मंत्रालयातून प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. आठवड्यातून दोन दिवस ही सेवा असेल. त्यामुळे मुंबईतून पुण्यात येणार्या नोकरदारांना हे सोयीचे ठरणार आहे. मंत्रालयातील कर्मचार्यांनी स्वारगेट ते मंत्रालय अशा बसची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार ही सेवा चालू केली आहे. सध्या या मार्गावर प्रतिदिन हिरकणी बसही चालू आहे. शिवनेरी बसच्या तिकिटात महिला आणि ६५ ते ७५ वर्षे या वयोगटातील ज्येष्ठ नागरिक यांना ५० टक्के सवलत असून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य बस सेवा आहे. या सेवेच्या तिकिटाची नोंदणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संकेतस्थळ अथवा भ्रमणभाष उपयोजनेवर प्रवासी करू शकतात, अशी माहिती एस्.टी.चे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली.