उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. दर्श टाव्हरे हा या पिढीतील एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
ज्येष्ठ कृष्ण तृतीया (२४.६.२०२४) या दिवशी कु. दर्श दिनेश टाव्हरे याचा १२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. दर्श दिनेश टाव्हरे याला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. नम्र
‘कु. दर्श कधी कुणाला उलट बोलत नाही. समोरची व्यक्ती कितीही रागावलेली असली, तरीही तो शांतपणे त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घेतो.
२. समंजस
अ. त्याचा शाळेत कुणाशी वाद होत नाही. तो त्याच्या लहान बहिणीला (चि. शरण्याला) सांभाळून घेतो. मी कधी सेवेसाठी बाहेर गेले, तर दर्श तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देतो. तो तिला हवे-नको ते पहातो.
आ. एकदा तो शाळेत पाय घसरून पडला. तेव्हा तेथील लादी त्याच्या डोक्याला लागली. त्यानंतर ४ – ५ दिवसांनी शाळेतील एका मुलाने दर्शला आधी जिथे मार लागला होता, तिथेच त्याला मारले. तेव्हा दर्शला चक्कर येत होती. त्या वेळी मी ‘‘त्या मुलाच्या पालकांना शाळेत बोलवायला हवे’’, असे म्हणाले. तेव्हा दर्श म्हणाला, ‘‘आई, जाऊ दे. त्याला ओरडू नकोस.’’ तेव्हा दर्शच्या समंजसपणाचे मला आश्चर्य वाटले.
३. नामजपादी उपाय करणे आणि देवाची ओढ
दर्श शाळेतून बसमधून घरी येईपर्यंत कुलदेवी श्री यमाईदेवीचा नामजप करतो. तो सुटीच्या दिवशी देवपूजा करतो आणि मारुतिस्तोत्र म्हणतो. तो दिवसभरात १ – २ वेळा स्वतःवरील आवरण काढतो, तसेच अत्तर कापराचे उपाय करतो. त्याला चित्रे काढण्याची आवड आहे. तो चित्रे काढतांना नामजप करतो.
४. मित्रांना नामजप करण्यासाठी सांगणे
एकदा दर्शचा एक मित्र त्याला म्हणाला, ‘‘अरे, तुझ्या तोंडात एकही अपशब्द कसा येत नाही ?’’ तेव्हा दर्शने त्याला सांगितले, ‘‘मी नामस्मरण करतो ना ! तूही नामजप कर.’’ एकदा दर्शने त्याच्या एका मित्राला वाढदिवसाच्या निमित्त सनातनची वही दिली. त्या वेळी दर्शने मित्राला सांगितले, ‘‘तू या वहीत नामजप लिही.’’
५. तो परीक्षेच्या वेळी आरंभी प्रार्थना करून परीक्षा झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करतो.
६. दर्शने श्रीकृष्णाचे एक चित्र काढले आहे. ते चित्र काढतांना तो ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी’ हे गीत म्हणत होता.
७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
एकदा दर्श चित्र काढतांना मला म्हणाला, ‘‘आई, रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यापूर्वी मी गुरुमाऊलींचे चित्र काढीन आणि त्यांना चित्र भेट देईन.’’ त्याचे बोलणे ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली.’
– सौ. पूनम टाव्हरे (कु. दर्शची आई), भोसरी, पुणे. (मार्च २०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |