Saudi Arabia Death Toll : उष्णतेमुळे १ सहस्र १५० हज यात्रेकरूंचा मृत्यू !

  • इजिप्तचे ६५८ यात्रेकरू मृत्यूमुखी !

  • हज यात्रेकरूंची फसवणूक केल्याप्रकरणी इजिप्तमधील १६ यात्रा आस्थापनांवर कारवाई

रियाध (सौदी अरेबिया) – सध्या चालू असलेल्या हज यात्रेच्या वेळी मक्केतील तापमान ४२ अंश ते ५० अंशांपर्यंत पोचल्याने उष्माघातामुळे अनेक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत उष्माघातामुळे एकूण १ सहस्र १५० यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे, तर २ सहस्र ७०० हून अधिक हज यात्रेकरूंना उष्माघाताचा झटका आला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये इजिप्तचे सर्वाधिक ६५८ यात्रेकरूंचा समावेश आहे. यानंतर इंडोनेशिया १९९, भारत ९८, जॉर्डन ७५, ट्युनिशिया ४९, पाकिस्तान ३५, तर इराणमधील ११ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मृत्यूमुखी पडलेल्या इजिप्तच्या ६५८ यात्रेकरूंपैकी ६३० व्हिसाविना हजला गेले होते. या भयंकर समस्येचा सामना करण्यासाठी इजिप्तने एक संकट केंद्र सिद्ध केले आहे.

इजिप्तचे खासदार महमूद कासिम यांनी यात्रा आस्थापनांवर (‘टूर ऑपरेटर्स’वर) हज यात्रेकरूंची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, यात्रा आस्थापनांकडून योग्य सुविधा पुरविल्या जात नसल्यामुळे अनेक हज यात्रेकरूंना  अडचणींचा सामना करावा लागला आणि यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान मुस्तफा यांनी १६ आस्थापनांचे परवाने रहित करण्याचा आदेश दिल्यानंतर हे परवाने रहित करण्यात आले आहेत. याखेरीज या आस्थापनांवर कारवाई करून दंड आकारण्याचाही आदेशही देण्यात आला आहे. दुसरीकडे हज यात्रेकरूंचा मोठ्या संख्येने मृत्यू झाल्यामुळे ट्युनिशियाच्या राष्ट्रपतींनी धार्मिक व्यवहार मंत्री यांना बडतर्फ केले आहे.