फुरसुंगी (पुणे) येथे पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – येथील फुरसुंगी पॉवर हाऊस परिसरात पाण्याच्या टँकरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याचे वृत्त मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी टँकरमधून महिलेचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला, तसेच संबंधित टँकरही कह्यात घेतला आहे. मृत महिलेची ओळख पटली असून, तिचे नाव कौशल्या मुकेश चव्हाण असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत असून ही आत्महत्या आहे कि हत्या ? याचेही अन्वेषण करण्यात येत आहे. मृत महिलेच्या अंगावर कोणत्याही प्रकारचे व्रण नसल्याची माहितीही समोर आली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची तक्रार !

या घटनेच्या प्रकरणी पोलीस निरीक्षक मानसिंह पाटील यांनी सांगितले की, मृत महिला ही तिचे पती आणि २ मुले यांच्यासह हांडेवाडी परिसरात रहात होती. कोंढवा पोलीस ठाण्यात ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. ज्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला, तो टँकर हांडेवाडी येथील पुरुषोत्तम ससाणे यांचा आहे. २० जूनला सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करतांना टँकरच्या पाईपमध्ये साडी अडकल्याने ही घटना उघडकीस आली.