१. धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू करणे
‘गोंदिया शहराच्या परिसरातील ग्रामीण भागांतील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू केला होता. त्यात ‘धर्मप्रेमींचा आचारधर्म’ या विषयांतर्गत ‘धर्मप्रेमींचे वर्तन कसे असावे ?’, ‘वस्त्र कसे असावे ?’, ‘त्यांनी प्रेमभाव निर्माण कसा करावा ?’, असे विविध विषय घेण्यात आले. ‘धर्मप्रेमी मद्य पिण्यासारख्या, तसेच गुटखा किंवा तंबाखू खाण्याच्या सवयींपासून दूर असावा’, असेही सांगण्यात आले.
२. धर्मप्रेमीने ‘नशामुक्ती संघटना’ स्थापन करून त्यात धर्मप्रेमींना सहभागी करून घेणे आणि परिसरातील मद्य पिणार्यांचा प्रतिसाद मिळून काही जण व्यसनमुक्त होणे
धर्मप्रेमींच्या गावातील एका धर्मप्रेमीने ‘नशामुक्ती संघटना’ स्थापन केली आणि धर्मशिक्षणवर्गात येणार्या धर्मप्रेमींना सहभागी करून घेतले. धर्मप्रेमींनी त्या संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. त्याला परिसरातील मद्य पिणार्यांचा प्रतिसाद मिळू लागला आणि त्यामुळे काही मद्य पिणारे व्यसनमुक्त झाले.
३. ‘नशामुक्ती संघटना’ स्थापन करणार्या धर्मप्रेमीने स्वतःचे मद्याचे दुकान चालू करणे आणि धर्मशिक्षणवर्गात मिळालेल्या योग्य शिकवणीमुळे या संघटनेपासून अन्य धर्मप्रेमी दूर जाणे
काही दिवसांनी संघटना स्थापन करणार्या धर्मप्रेमीने स्वतःचा चरितार्थ चालावा; म्हणून मद्याचे दुकान चालू केले. हे धर्मशिक्षणवर्गात येणार्या धर्मप्रेमींना आवडले नाही. त्यांनी लगेच एकत्रित बैठक घेऊन त्या मद्य विकणार्या धर्मप्रेमीच्या संघटनेतून स्वतःची नावे काढून घेतली. सर्वानुमते त्या धर्मप्रेमीच्या समवेत संपर्क न ठेवण्याचे ठरवले. ‘व्यसन न करण्याची शिकवण आम्हाला धर्मशिक्षणवर्गातून मिळाली’, असे बाहेर पडलेल्या धर्मप्रेमींनी सांगितले.
४. ‘धर्मप्रेमींना राममंदिराचे शिल्पकार बनायचे असून ‘आपण रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे वाटणे
या धर्मप्रेमींच्या सत्संगात अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या संदर्भात चर्चा करत असतांना एक धर्मप्रेमी म्हणाले, ‘‘आज आपण राममंदिराचे साक्षीदार आहोत; पण यानंतर आपल्याला राममंदिराचे शिल्पकार बनायचे आहे; म्हणजेच रामराज्य आणायचे आहे.’’
– पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत), अमरावती (४.६.२०२४)