खलिस्तानी आतंकवादी भारताचीच नव्हे, तर कॅनडाचीही हानी करत आहेत ! – खासदार चंद्र आर्य, कॅनडा

कॅनडाच्या संसदेत भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनी कॅनडाला फटकारले !

खासदार चंद्र आर्य

ओटावा (कॅनडा) – भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी कॅनडाच्या संसदेला खलिस्तानी आतंकवाद्यांनी हवेत उद्ध्वस्त केलेल्या विमानाची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘खलिस्तानी आतंकवादी भारताचीच नव्हे, तर कॅनडाचीही हानी करत आहेत.’ खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्यावरून कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले. त्या पार्श्‍वभूमीवर आर्य बोलत होते.

आर्य पुढे म्हणाले की, खलिस्तानी समर्थक देशात हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत. २३ जून हा आतंकवादाचे बळी ठरलेल्या नागरिकांचा स्मृतीदिन आहे. ३९ वर्षांपूर्वी याच दिवशी आतंकवाद्यांकडून एअर इंडियाचे विमान आकाशात उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यात ३२९ प्रवासी आणि कर्मचारी मारले गेले होते. कॅनडाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे आक्रमण होते. यात मरणार्‍यांपैकी २६८ कॅनडाचे नागरिक होते, वर उर्वरितांमध्ये २७ ब्रिटीश आणि २४ भारतीय नागरिक होते. नुकतेच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा कॅनडाच्या संसदेत जल्लोष साजरा करण्यात आला, यावरून देशात काळ्या शक्ती पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येते.

चंद्र आर्य यांनी २३ जून १९८५ या दिवशीच्या वरील घटनेत बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राजधानी ओटावा येथील डाऊ लेकजवळील स्मारकाच्या ठिकाणी आणि ओंटारियोमधील क्वीन्स पार्कमध्ये दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.