आरोपीला कह्यात देण्याची मागणी; संतप्त जमावाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक !

  • जामनेर (जळगाव) येथे ६ वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण

  • १० ते १२ पोलीस कर्मचारी घायाळ !

जळगाव – येथील सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली. हे समजताच २० जूनच्या रात्री १० वाजता शेकडो जणांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि आरोपीला कह्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली; मात्र पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हालवल्याचे कळताच जमावाने जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. यात १० ते १२ पोलीस कर्मचारी घायाळ झाले आहेत. या वेळी दुचाकी वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली. पोलिसांना रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्याची वेळ आली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. जमावाचा उद्रेक पाहून पोलिसांना हवेत ७-८ गोळ्या झाडाव्या लागल्या. सध्या जामनेरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तणावपूर्ण आहे.

‘दगडफेक करणार्‍या संबंधितांना कह्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेस उत्तरदायी असलेल्या कुणालाही सोडणार नाही’, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

संपादकीय भूमिका 

नागरिकांचा उद्रेक पहाता पोलिसांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !