‘प्रसाद प्रकाशना’च्या वतीने आयोजित पुणे येथील ‘स्मृतीगौरव’ पुरस्कार वितरण सोहळा !
पुणे – ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे महाभारतात सगळ्या विषयांचा अंतर्भाव आहे. रामायण आणि महाभारत या साहित्यातील अभिजात कलाकृती आहेत. अनेक विषयांचा समावेश महाभारतामध्ये असून हा ज्ञानाचा खजिना आहे. रामायण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत ज्येष्ठ मंदिर आणि मूर्तीशास्त्र अभ्यासक आणि डेक्कन कॉलेज-अभिमत विद्यापीठ, पुणेचे माजी अध्यक्ष डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले. येथील ‘प्रसाद प्रकाशना’च्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण आणि प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. देगलूरकर बोलत होते. या वेळी डॉ. माया पाटील यांना मनोहर तथा ‘बापूसाहेब जोशी स्मृतीगौरव’ पुरस्कार, तर शरद गोगटे यांना ‘मंजिरी मनोहर जोशी स्मृतीगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपिठावर ज्येष्ठ संस्कृततज्ञ डॉ. सुचेता परांजपे, प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठ, ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते. भारतभरातील गड, मंदिरे, स्तूप, लेणी या संस्कृतीच्या पाऊलखुणांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक असल्याचे मत डॉ. माया पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या की, महाभारतासारख्या अशा कलाकृतीच आपल्या बौद्धिक, भावनिक आणि तार्किक क्षमतांना आव्हान देतात. मनुष्यजीवनात ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, त्याचे यथोचित वर्णन महाभारतात करण्यात आले आहे. महाभारतात मांडलेल्या अनेक पेचांना आजही आपण अनेकदा सामोरे जातो आणि परिस्थितीनुरूप सारासार विचार करून आपण निर्णय घेतो.