९७४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त !
श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई
मुंबई – महाराष्ट्रात राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि प्रादेशिक असे मिळून एकूण १२३ राजकीय पक्षांनी लोकसभेची निवडणूक लढवली. राजकीय पक्षांसह ६१८ अपक्ष उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. अपक्ष उमेदवारांपैकी तब्बल ९८ टक्के, म्हणजे ६०७ उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम (‘डिपॉझिट’) राखता आली नाही. राजकीय पक्षांचे उमेदवार अणि अपक्ष उमेदवार मिळून महाराष्ट्रातील एकूण ९७४ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक मुख्यत्वेकरून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), मनसे यांची महायुती, तर काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची महाविकास आघाडी यांच्यात झाली. या पक्षांचे उमेदवार वगळता महाराष्ट्रात अनेक स्थानिक पक्षांच्या उमेदवारांची अनामत रक्कम मोठ्या प्रमाणात जप्त झाली आहे.
या पक्षांनी गमवले सर्वाधिक ‘डिपॉझिट’ !
या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या सर्वाधिक ४६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्या खालोखाल वंचित बहुजन आघाडी २५, भारतीय जवान-किसान पार्टी १३, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी १५, भीमसेना १४ आदी पक्षांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. उर्वरित पक्षांच्या १० पेक्षा अल्प उमेदवारांची रक्कम जप्त झाली.
या मतदारसंघात सर्वाधिक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त !
अमरावती आणि पुणे मतदारसंघात प्रत्येकी २५ उमेदवार, अहिल्यानगर, मावळ अन् छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्येकी २२, बारामती २९, बीड ३०, भिवंडी, हिंगोली २०, धाराशिव २१, रावेर आणि हातकणंगले प्रत्येकी १७, गडचिरोली-चिमूर, जालना, कल्याण, मुंबई उत्तर-मध्य प्रत्येकी १८, ती शिरूर मतदारसंघात २२, यासह इतरही मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या ठेवी जप्त झाल्या आहेत.
अनामत रक्कम किती असते ? आणि केव्हा जप्त होते ?प्रत्येक मतदारसंघात विजयी उमेदवाराला जितकी मते मिळाली, त्या एकूण मतांच्या तुलनेत त्या मतदारसंघातील ज्या उमेदवारांना ६ टक्क्यांहून अल्प मते पडतात, त्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम निवडणूक आयोग जप्त करते. उमेदवार खुल्या वर्गातील असेल, तर त्यांना २५ सहस्र रुपये, तर मागासवर्गीय उमेदवारासाठी १० सहस्र रुपये इतकी रक्कम निवडणुकीपूर्वी उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ‘अनामत रक्कम’ (डिपॉझिट) म्हणून जमा करावी लागते. उमेदवारांना विजयी उमेदवाराच्या मतांपेक्षा ६ टक्क्यांहून अल्प मते पडली, तर ही रक्कम जप्त केली जाते. |
मते फोडण्यासाठी उभे केले जात आहेत उमेदवार !अनेकदा राष्ट्रीय किंवा राज्य स्तरीय मोठे पक्ष आपल्या तुल्यबल्य स्पर्धकांची मते फोडण्यासाठी विविध समाजांचे प्रतिनिधी अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी उभे करतात. त्यांच्या निवडणुकीचा व्यय मोठ्या पक्षांकडून केला जातो. अशा प्रकारे मतांची फोडाफोडी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार प्रत्येक मतदारसंघात आढळून येतात. हे फोडाफोडीचे राजकारण ’नियमात बसवून’ केले जात असल्यामुळे निवडणूक आयोगालाही या विषयी थेट कारवाई करता येत नाही. |