हत्तींच्या समस्येवर गेल्या २१ वर्षांत केलेल्या खर्चाचा तपशील द्या, अन्यथा उपोषण करणार ! – संजय नाईक, सामाजिक कार्यकर्ते

दोडामार्ग – तालुक्यात हत्तींची समस्या सोडवण्यासाठी वर्ष २००३ ते २०२४ या कालावधीत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. या २१ वर्षांत करण्यात आलेल्या खर्चाचा आतापर्यंचा तपशील द्यावा अन्यथा २६ जूनपासून नागपूर येथील प्रधान  वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची चेतावणी सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना निवेदनाद्वारे दिली आहे. (शासनाने हत्तींची समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत विविध योजना राबवल्या; मात्र ही समस्या काही सुटली नाही. शेतकरी, बागायतदार, तसेच ग्रामस्थ यांना आजही हत्तींच्या उपद्रवामुळे हानी सोसावी लागत आहे. तसेच जीवित आणि वित्त हानीही झाली आहे. एवढा खर्च करूनही समस्या सुटत नसेल, तर त्यावरील उपाययोजना तकलादू आहेत, हे स्पष्ट होते. त्यामुळे वरवरच्या उपाययोजना करून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी सरकार आणि प्रशासन यांनी अभ्यासपूर्वक ठोस कार्यवाही करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

दोडामार्ग तालुक्यातील शेतकर्‍यांना गेल्या २१ वर्षांमध्ये हत्तींपासून पुष्कळ मोठी हानी सोसावी लागली आहे. त्यासह जीवित हानीही झाली आहे. ही समस्या आताही चालू आहे. या समस्येला पायबंद घालण्याच्या उद्देशाने शासनाकडून मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे; मात्र त्यात नियोजनबद्धता नाही. हत्तींची समस्या सोडवण्याच्या नावाखाली अधिकारी स्वत:चे हित जोपासत आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी. हत्तींविषयी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत; मात्र त्याचा परिणाम दिसत नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून सावंतवाडी आणि दोडामार्ग वन कार्यालयांची कसून चौकशी केली जावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका 

इतकी वर्षे होऊनही हत्तींची समस्या न सुटणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !