आंबोली घाटात अस्वच्छता करणार्‍यांना १ सहस्र रुपये दंड आकारला जाणार

सावंतवाडी – निसर्गरम्य आंबोली घाट आणि तेथील धबधबा परिसरात सावंतवाडी वन विभागाच्या वतीने सामूहिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी १० कि.मी. अंतराच्या घाटमार्गाच्या दुतर्फा स्वच्छता करण्यात आली. १५ जूनपासून आंबोली घाट, तसेच धबधब्याच्या परिसरात अस्वच्छता करणारे, तसेच माकडांना खाऊ घालणारे यांच्याकडून १ सहस्र रुपये उपद्रव शुल्क आकारण्यात येणार आहे.

उपवनसंरक्षक एस्. नवकिशोर रेड्डी आणि साहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या संकल्पनेतून जैवविविधतेने नटलेला आंबोली घाट, तेथील धबधबा यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने ही स्वच्छता मोहीम राबण्यात आली होती. या वेळी गोळा केलेला अनुमाने १ टन कचरा सावंतवाडी नगरपरिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्रात सुपुर्द करण्यात आला. या मोहिमेत धबधब्याच्या परिसरातील स्टॉलधारक, आंबोली येथील काही ग्रामस्थ, पारपोली येथील वन व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी सहभाग घेतला होता.

आंबोली घाटातील निसर्ग आणि जैवविविधता टिकवण्यासाठी सर्व नागरिक अन् पर्यटक यांनी वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.