छत्रपती संभाजीनगर येथे ‘प्रीपेड वीजमीटर’चा निर्णय मागे; ‘स्मार्ट डिजीटल मीटर’च बसवणार !

छत्रपती संभाजीनगर – महावितरणने सक्तीने ‘प्रीपेड मीटर’ बसवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आता नवे स्मार्ट डिजीटल मीटर बसवण्यात येतील. त्यामुळे कर्मचार्‍यांना मीटरपर्यंत जाऊन ‘रिडिंग’ घ्यावे लागणार नाही. छत्रपती संभाजीनगर शहरात प्रारंभी २८ सहस्र शासकीय ग्राहकांना नवीन मीटर बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर फिडरनिहाय बसवण्याचे काम केले जाईल. ‘पोस्टपेड’ सेवा चालूच रहाणार असल्याने देयक भरले नाही म्हणून ग्राहकांची वीज तोडली जाणार नाही, अशी माहिती ‘महावितरण’चे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी दिली. त्यामुळे महावितरणने ‘प्रीपेड मीटर’चे धोरण पालटल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशभरातून तीव्र विरोध होत असतांना ‘महावितरण’ने छत्रपती संभाजीनगर येथे ३० सहस्र ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बसवण्याची सिद्धता केली होती. स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले, तर वीज कायदेभंग होईल याकडेही लक्ष वेधले होते. यानंतर नागरिकांसह विविध संघटनांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे महावितरणने प्रीपेड मीटरचा निर्णय मागे घेत स्मार्ट डिजीटल मीटरची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही सेवांचे पर्याय आहेत.