नम्र, प्रेमळ, उत्तम नेतृत्व आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ असे विविध दैवी गुण असलेले सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४८ वर्षे) !

ज्येष्ठ शुक्ल नवमी (१५.६.२०२४) या दिवशी सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा यांचा ४८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त केरळ येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. रमानंद गौडा यांच्या चरणी त्यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. रमानंद गौडा

१. सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर (वय ४४ वर्षे), कोची, केरळ.

सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर

१ अ. गुरुकार्याची तळमळ : ‘पू. रमानंद गौडा यांच्यामध्ये गुरुकार्याची तीव्र तळमळ आहे. त्यांनी आम्हाला ‘केरळ राज्यात प्रसाराची घडी कशी बसवायची ?’, याविषयी केवळ सांगितले नाही, तर आमच्याकडून त्या संदर्भात करून घेतले. ते अजूनही आम्हाला सूत्रे पाठवायला सांगतात आणि ‘पुढचे प्रयत्न कसे करायचे ?’,  याविषयी सांगतात.’

२. कु. आदिती सुखटणकर

कु. आदिती सुखटणकर

२ अ. इतरांचा विचार करणे : ‘एका कार्यक्रमाची सिद्धता करतांना वीजपुरवठा खंडित झाला. तेव्हा साधकांनी ‘पू. रमानंदअण्णांसाठी एक पंखा लावूया’, असा विचार केला. तेव्हा पू. अण्णा म्हणाले, ‘‘केवळ माझ्यासाठी पंखा आणि साधकांसाठी नाही, असे नको, माझ्यासाठी वेगळी व्यवस्था नको.’’

२ आ. नम्र आणि सेवा करायला तत्पर असणे : पू. अण्णा संत असूनही आणि त्यांना शारीरिक त्रास असूनही ते चारचाकी गाडी चालवतात. एकदा आम्ही त्यांच्या समवेत जात असतांना ‘चारचाकी गाडी चालवणार्‍या साधकाला त्रास होत आहे’, हे लक्षात आल्यावर पू. अण्णांनी रात्रीच्या वेळी गाडी चालवली. ‘संत किती नम्र आणि सेवा करायला तत्पर असतात !’, हे मला शिकायला मिळाले.’

३. सौ. अवनी श्रीराम लुकतुके, कोची, केरळ.

सौ. अवनी लुकतुके

अ. ‘पू. अण्णांचा ग्रंथांचा अभ्यास पुष्कळ चांगला आहे. ते प्रत्येक सूत्र सांगत असतांना ग्रंथांतील वेगवेगळी उदाहरणे देतात. त्यामुळे साधकांना साधनेची दिशा मिळते आणि सकारात्मक रहाता येते.’

४. श्रीमती सुजाता ठक्कर (वय ६३ वर्षे), कोइमतूर, तमिळनाडू.

४ अ. देहाची जाणीव नसणे : पू. अण्णांना पाठदुखीचा तीव्र त्रास होतो, तरीही ते मार्गदर्शन करतांना किंवा सत्संगात एकाच ठिकाणी अधिक वेळ बसतात.

५. श्री. कनकराज, कण्णूर, केरळ.

अ. पू. अण्णांनी मार्गदर्शनात सांगितले, ‘‘साधकांनी सेवा आणि साधना योग्य पद्धतीने होण्यासाठी विचारून करणे, समर्पण आणि मनोभावाने प्रयत्न करणे, नियोजन करणे आणि सेवेचा आढावा देणे, असे प्रयत्न करायला हवेत. साधकांनी त्यांच्या साधनेत अडथळे आणणारे स्वभावदोष आणि अहं दूर करण्यासाठी कठोर प्रयत्न करून ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’’

६. सुश्री (कु.) रश्मी परमेश्वरन् (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४७ वर्षे), कोची, केरळ.

सुश्री (कु.) रश्मी परमेश्वरन्

६ अ. हितचिंतक आणि जिज्ञासू यांच्याशी जवळीक साधून त्यांना साधना करायला प्रेरित करणे : केरळ येथे २४ वर्षांपासून प्रसारकार्य चालू आहे. पू. रमानंद गौडा केरळ राज्यात आल्यावर त्यांनी हितचिंतक आणि जिज्ञासू यांच्याशी लगेच जवळीक साधली.

१. श्रीमती चंद्रिका मेहर या हितचिंतक आहेत. पूर्वी त्या सत्संगाला येत होत्या. नंतर त्या काही अडचणींमुळे सत्संगाला येऊ शकत नव्हत्या. पू. रमानंदअण्णा यांच्याशी त्यांची भेट झाल्यावर त्यांच्या विचारसरणीमध्ये पालट झाला. आता त्यांना कितीही अडचणी आल्या, तरी त्या कोची येथील सेवाकेंद्रात आठवड्यातून तीन दिवस नामजप करण्यासाठी येतात. त्यांच्या मुलीने पू. अण्णांच्या मार्गदर्शनामुळे प्रभावित होऊन साधना चालू केली आहे.

२. केरळ येथील अनेक वर्षांपासून असलेल्या काही साधकांचा काही कारणास्तव संस्थेशी काही कालावधीसाठी संपर्क अल्प झाला होता. पू. अण्णांचे मार्गदर्शन ऐकून त्या साधकांना पुष्कळ ऊर्जा मिळाली. एक साधक पू. अण्णा यांच्या समवेत मंगळुरू सेवाकेंद्रात जाऊन एक आठवडा राहिले आणि अाता ते साधक दायित्व घेऊन सेवा करत आहेत.

६ आ. साधकांना पुढच्या टप्प्यात नेण्याची तळमळ : ‘पू. अण्णा मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘साधना समजून घेऊन करायला हवी. ‘सामान्य कार्यकर्ता, साधक, शिष्य आणि उत्तम शिष्य कसे असतात ?’, हे समजले पाहिजे. आपले गुरु महान आहेत. गुरुकार्य दायित्व घेऊन करण्याला महत्त्व आहे. साधकांनी सेवेसाठी अधिक वेळ देणे आवश्यक आहे.’’ त्यांचे मार्गदर्शन ऐकून सर्व साधकांचे प्रयत्न वाढले.’

७. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘प.पू. गुरुदेवांनी पू. अण्णांना केरळ येथे पाठवून आम्हा साधकांवर पुष्कळ कृपा केली आहे. पू. अण्णांमुळे आम्हाला साधना करण्यासाठी उभारी मिळाली. आम्ही सर्व साधक गुरुदेव आणि पू. अण्णा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. ‘आमच्याकडून साधनेचे प्रयत्न होऊन सगळ्यांना आनंदप्राप्ती होऊ दे’, अशी गुरुचरणी प्रार्थना आहे.’ – केरळ राज्यातील सर्व साधक

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३.४.२०२४)


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेल्या उत्कट भावामुळे साधकांना भावजागृती आणि सुगंधाची अनुभूती देणारे सनातनचे पू. रमानंद गौडा !

पू. रमानंदअण्णा एका साधिकेच्या घरी गेल्यावर तिला त्यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी तिला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. सिंधू राकेश

१. पू. रमानंद गौडा साधिकेच्या घरी गेल्यावर त्यांच्यातील निरपेक्ष प्रेमामुळे भावजागृती होणे

‘२५.२.२०२४ या दिवशी सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) आमच्या घरी आले होते. ते घरी आल्यामुळे आम्हाला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी त्यांनी त्यांच्याकडे अल्प कालावधी असूनही आमच्याशी बोलण्यासाठी पुष्कळ वेळ दिला, तसेच आश्रमातून आणलेला महाप्रसादही आमच्या घरी ग्रहण केला. त्यांनी आम्हाला पुष्कळ प्रेम दिले. त्यांच्या सत्संगात असतांना माझ्या डोळ्यांतून अखंड आनंदाश्रू वहात होते. त्यामुळे आमची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

२. पू. रमानंद गौडा यांच्या अस्तित्वाने घरात आणि आजूबाजूच्या वातावरणात सात्त्विकता निर्माण होणे

पू. अण्णा घरी येऊन गेल्यावर माझी धाकटी बहीण सौ. कृष्णा घरी आली होती. ती मला म्हणाली, ‘‘संपूर्ण घरात तीर्थाचा सुगंध येत आहे.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले की, ‘संतांच्या अस्तित्वाने घरात आणि आजूबाजूच्या वातावरणात सात्त्विकता निर्माण झाली आहे. सर्व वातावरण सकारात्मक झाले आहे.’

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी असणारा भाव आणि भक्ती हेच केवळ शाश्वत असल्याचे पू. अण्णांच्या मार्गदर्शनातून लक्षात येणे

संध्याकाळी पू. अण्णांचे श्री. जयराजन मणिक्कोत या साधकांच्या घरी मार्गदर्शन होते. तिथे आम्ही गेलोे. ‘पू. अण्णांचा प्रत्येक शब्द अंतःकरणात जात असून साधनेसाठी पुष्कळ प्रयत्न करायला पाहिजेत’, याची जाणीव करून देत होता. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले साक्षात् श्रीकृष्ण स्वरूप आहेत. त्यांच्याविषयी असणारा भाव आणि भक्ती हेच केवळ शाश्वत आहे’, हे पू. अण्णांच्या मार्गदर्शनातून आमच्या मनात बिंबले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सिंधू राकेश, कण्णूर, केरळ. (१.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक