(जी-७ या परिषदेमध्ये इटली, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जपान, जर्मनी आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे.)
रोम (इटली) – इटलीमध्ये ‘जी-७’ शिखर परिषद चालू झालेली असतांना दुसरीकडे इटलीच्या संसदेतील काही खासदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. इटलीचे परराष्ट्रमंत्री अँटोनियो ताजानी यांनी या घटनेबाबत खेद व्यक्त करत ‘माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत’, असे म्हटले.
इटलीतील काही प्रदेशांना अधिक स्वायत्तता देण्याच्या सूत्रावरून ही घटना घडली. या प्रदेशांना स्वायत्तता दिल्यास उत्तर-दक्षिण अशी प्रादेशिक दरी निर्माण होईल आणि दक्षिणी प्रदेशांतील गरिबीत वाढ होईल, असा दावा इटलीच्या संसदेतील विरोधी पक्षांनी केला आहे. सरकारने संसदेत यासंदर्भात प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते लियोनार्डो डोनो यांनी मंत्री रॉबर्टो कैल्डेरोली यांना राष्ट्रध्वज देण्याचा प्रयत्न केला; मात्र रॉबर्टो कैल्डेरोली यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. त्या वेळी अचानक विरोधी पक्षातील सदस्यांनी रॉबर्टो कैल्डेरोली यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेच सत्ताधारी पक्षातील काही सदस्यही त्याठिकाणी पोचले. त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.