या निमित्ताने स्वत:च्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शनही पुणेकरांना घडले ! – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद मिळण्यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केल्याचे प्रकरण !

मुरलीधर मोहोळ आणि सुप्रिया सुळे

पुणे – खरे तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही गोष्ट समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली, तर याचे निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होते. असो पण या निमित्ताने स्वत:च्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शनही पुणेकरांना घडले, असा टोला पुण्याचे नवनिर्वाचित भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे. मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याला मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘पुण्याला मंत्रीपद मिळाले याचा मला आनंद आहे; पण त्याचा लाभ ठेकेदारांना न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा’, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. केंद्राच्या नवीन सरकारमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्याकडे हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्रीपद आहे. सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर देतांना मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की, उरला प्रश्न ठेकेदारांचा, तर ठेकेदारांना कुणी पोसले ? कुणी मोठे केले ? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कुणाचे ‘पार्टनर’ आहेत ? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असली तकलादू टिपणी करून स्वतःचे हसे सोडून दुसरे काही होणार नाही.