माळेगाव (बारामती) येथे चारचाकीमध्ये अवैध गर्भलिंगनिदान करणार्‍या आधुनिक वैद्यासह दलालाला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

बारामती (जिल्हा पुणे) – येथील माळेगावच्या गोफणेवस्ती येथे बांधकामाच्या ठिकाणी चारचाकीमध्ये ‘पोर्टेबल सोनोग्राफी मशीन’द्वारे गर्भलिंगनिदान सोनोग्राफी करणार्‍या डॉ. मधुकर शिंदे यांच्यासह बाळासाहेब घुले या दलालाला माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ‘पोर्टेबल सोनोग्राफी मशीन’ही जप्त केले आहे. या प्रकरणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. विशेष म्हणजे डॉ. शिंदे यांना अशा प्रकारच्या गुन्ह्यात अनेक वेळा अटक झाली आहे. (पहिल्याच वेळी त्यांच्यावर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा करण्याचे धाडस झाले नसते. – संपादक)

पुण्याच्या ग्रामीण भागात चारचाकी गाडीमध्ये गर्भलिंगनिदान होत असल्याची तक्रार पुण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. यमपल्ले यांनी शिक्रापूर, यवत, दौंड, इंदापूर आणि बारामती येथील वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगताप यांनी पोलिसांना डॉ. शिंदे यांच्याविषयी माहिती दिली होती. यामध्ये अटक करण्यात आलेले डॉ. मधुकर शिंदे हे या प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत आहेत. त्यांच्यावर यापूर्वी दौंडमध्ये, तसेच सातारा येथेही गुन्हे नोंद आहेत.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे अवैध गर्भलिंगनिदान करणार्‍या आधुनिक वैद्याची वैद्यकीय मान्यता रहित करणे आवश्यक !