सनातनच्या ११० व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांच्या आजारपणात त्यांची मुलगी सौ. ज्योती दाते यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा !’ या प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तीप्रमाणे वागणारी माझी आई पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी (सनातनच्या ११० व्या (व्यष्टी) संत, वय ८२ वर्षे) यांच्या आजारपणात मला शिकायला मिळालेली सूत्रे कृतज्ञताभावात सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी

१. पू. आईंच्या छातीत दुखायला लागणे आणि तातडीने ‘लाईफ सेव्हींग’चे इंजेक्शन दिल्यावर ते बाहेर  येणे (आऊट होणे), त्यामुळे पू. आईंचा हात सुजून पुष्कळ वेदना होणे

सौ. ज्‍योती दाते

‘१६.४.२०२४ या दिवशी पहाटे पू. आईंच्या (पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांच्या) छातीत दुखायला लागले. त्यांना पुष्कळ त्रास होत असल्यामुळे एका रुग्णालयात भरती केले. त्यांना तातडीने एक ‘लाईफ सेव्हींग’ (जीव वाचवण्यासाठी देण्यात येणारे) इंजेक्शन दिले. ते इंजेक्शन देतांना चूक झाली. ते इंजेक्शन आऊट झाले. त्यामुळे पू. आईंचा पूर्ण हात सुजून काळा पडला. त्यांच्या हाताला पुष्कळ वेदना होत होत्या. ‘त्यांना रक्त पातळ व्हायचे औषध चालू असल्याने रक्त गोठले नाही’, असे डॉक्टरांनी सांगितले.

२. रक्तवाहिन्यात अडथळे असल्यामुळे ‘अँजिओप्लास्टी’ करण्याचे ठरणे

१७.४.२०२४ या दिवशी आधुनिक वैद्यांनी ‘अँजिओग्राफी’ (हृदयातील रक्तवाहिन्यांतील अडथळे शोधण्यासाठी करावयाची चाचणी) केली आणि दोन ठिकाणी ९० टक्के ब्लॉक (रक्तवाहिन्यांतील अडथळे) असल्याचे निदान झाले. पू. आईंची ‘अँजिओप्लास्टी’ (हृदयाकडे रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्यांतील अडथळे दूर करण्यासाठी करावे लागणारे शस्त्रकर्म) करायची होती. त्या रुग्णालयात चांगल्या सुविधा नसल्याने १८.४.२०२४ या दिवशी आम्ही पू. आईंना दुसर्‍या चांगल्या रुग्णालयात भरती केले.

३. आधीच्या रुग्णालयात अँजिओग्राफी करतांना मांडीवर गाठ येणे आणि अँजिओप्लास्टी करतांना त्या गाठीमुळे अन् अन्य शारीरिक त्रासांमुळे पू. आईंना पुष्कळ वेदना होणे

१९.४.२०२४ या दिवशी पू. आईंची ‘अँजिओप्लास्टी’ केली. ‘ती करणे फारच धोक्याचे होते’, असे तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले. तिची ‘अँजिओप्लास्टी’ सहजतेने करता आली नाही. त्यासाठी तज्ञांना वेगळे ‘टेक्निक’ (तंत्र) वापरावे लागले. त्यामुळे ब्लॉक (अडथळे) काढायला अधिक वेळ लागला. अगोदरच्या हॉस्पिटलमध्ये ‘अँजिओग्राफी’ करतांना तिच्या मांडीला रक्ताची गाठ आली होती. ‘अँजिओप्लास्टी’ करण्यापूर्वी गाठीचे शस्त्रकर्म करता येत नसल्याने ती गाठ दाबून तिच्यातील रक्त काढावे लागले. त्या वेळी पू. आईंना पुष्कळ वेदना होत होत्या.

४. बद्धकोष्ठतेचा त्रास होणे

‘अँजिओप्लास्टी’ झाल्यानंतर २०.४.२०२४ या दिवशीपू. आईंना बद्धकोष्ठतेचा त्रास झाला. पू. आईंना असे बरेच त्रास झाले आणि वेदना सहन कराव्या लागल्या. २२.४.२०२४ या दिवशीपू. आईंना घरी सोडण्यात आले.

५. मांडीच्या दुखर्‍या भागावर आधुनिक वैद्यांनी भूल न देता दाब देण्याची (कॉम्प्रेस करण्याची) प्रक्रिया केल्याने पू. आईंना असह्य वेदना होणे

मांडीच्या ज्या ठिकाणी ‘अँजिओप्लास्टी’ केली होती, तिथे त्यांना पुष्कळ दुखायला लागले. त्या ठिकाणी त्या हातही लावू देत नव्हत्या. याचे निदान करण्यासाठी डॉक्टरांनी २४.४.२०२४ पुन्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी बोलवले. सोनोग्राफीतून पू. आईंना ‘pseudoaneurysm’ (स्यूडोएन्युरिझम) (टीप) झाले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. ‘त्या भागावर दाब देऊन (कॉम्प्रेस करूनच) तो त्रास दूर करावा लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. त्या दृष्टीने २५.४.२०२४ या दिवशी आधुनिक वैद्यांनी कॉम्प्रेस करण्याची प्रक्रिया केली. प्रति १५ मिनिटांनी असे तीनदा त्या दुखर्‍या भागावर कोणतीही भूल न देता दाब देऊन त्यांनी तो त्रास दूर केला. साधारण ४५ मिनिटे चालू असलेल्या या प्रक्रियेत पू. आईंना असह्य वेदना सहन कराव्या लागल्या.

(टीप : ‘रक्तवाहिनीच्या भिंतीला दुखापत झाल्यास ‘स्यूडोएन्युरिझम’ (एक प्रकारचा फुगवटा निर्माण) होतो. यात वाहिनीतून गळणारे रक्त झिरपून बाहेर येते आणि उतींमध्ये (म्हणजे टिश्यूंमध्ये) जमा होते.’)

६. सहनशीलता

या आजारपणात पू. आई पुष्कळ स्थिर होत्या. त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘असा त्रास कोणत्याही साधकाला होऊ देऊ नका.’ त्यांनी स्वतःचा त्रास न्यून व्हावा, यासाठी प्रार्थना केली नाही. त्यांनी परिस्थिती स्वीकारली आणि प्रचंड वेदना सहन केल्या.

७. साधनेची तळमळ

२१.४.२०२४ या दिवशी पू. आईंची ‘अँजिओप्लास्टी’ होती. त्याच दिवशी सकाळी पुण्यात ‘सनातन गौरवदिंडी’ होती. ‘ती दिंडी निर्विघ्नपणे पार पडावी’ यासाठी पू. आईंनी त्यांना दिलेली नामजप करण्याची सेवा पूर्ण केली. त्यांची दिंडीला जाण्याची तीव्र इच्छा होती. त्यांनी ‘व्हिडिओ कॉल’च्या माध्यमातून १० मिनिटे दिंडी पाहिली. ‘त्या माध्यमातून दिंडीत सहभागी होता आले’, याचा त्यांना अपार आनंद झाला.

८. साधकांना भेटू न शकल्याने खंत वाटणे

पू. आईंना रुग्णालयात भरती केल्यानंतर काही साधक भेटायला आले होते; परंतु आईंवर उपचार चालू होते; म्हणून वैद्यांनी साधकांना त्यांना भेटू दिले नाही. याची पू. आईंना पुष्कळ खंत वाटली.

९. कृतज्ञताभावात रहाणे

पू. आई रुग्णालयात असतांना त्यांना एका संतांचा भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘तुमच्यामुळे रुग्णालयाची शुद्धी होत आहे.’’ त्या वेळी ‘देव आपल्यासाठी किती करतो !’, असे वाटून पू. आईंना पुष्कळ कृतज्ञता वाटली अन् त्यांचा भाव जागृत झाला.

१०. प्रसन्नता

आजारपणात पुष्कळ वेदना सहन करूनही पू. आई प्रसन्न दिसत होत्या. त्यांच्या मुखावर ‘यातना सहन करत आहे’, असा लवलेशही नव्हता. त्यांच्याकडे पाहून आणि त्यांच्याशी बोलतांना पुष्कळ आनंद मिळत होता.

११. नामजपादी उपाय स्वतःच करणे

पू. आईंच्या सगळ्या त्रासांवर वेळोवेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आध्यात्मिक उपाय सांगितले. पू. आईंची प्रकृती बरी नव्हती; म्हणून अन्य संतांनी त्यांच्यावर नामजपाचे उपाय केले. थोडे बरे वाटल्यावर त्या स्वतःच नामजप करू लागल्या.

१२. तीव्र प्रारब्धावर श्रद्धेच्या बळावर मात करणार्‍या संतांचे दैवी गुण शिकता येणे

या प्रसंगात ‘संतमहात्म्य कसे असते ? भगवंताचे सगुण रूप असलेले संत तीव्र प्रारब्धावर श्रद्धेच्या बळावर कशी मात करतात ?’, हे मला शिकता आले. पू. आईंची सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींवर असलेली दुर्दम्य श्रद्धा, त्यांचे अखंड अनुसंधान, तळमळ, अफाट सहनशक्ती, स्थिरता, परिस्थिती स्वीकारणे, संपूर्ण भार देवावर सोपवणे, हे सर्व दैवी गुण मला अनुभवता आले.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला हे सर्व अनुभवता आले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. ज्योती दाते, रामनाथी आश्रम, (वय ५९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)