Israel In Blacklist : संयुक्त राष्ट्रांकडून इस्रायलचा ‘काळ्या सूचीत’ समावेश

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस

तेल अविव – गाझामधील आक्रमणाच्या वेळी इस्रायलने मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी इस्रायलला काळ्या सूचीत टाकले आहे. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार इस्रायल व्यतिरिक्त संयुक्त राष्ट्रांनी हमासलाही ‘लिस्ट ऑफ शेम’मध्ये (लज्जास्पद कृत्ये करणार्‍यांची सूचीमध्ये) समावेश केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या कार्यालयाने त्याच्या वार्षिक अहवालात ही सूची अंतिम केली. यानंतर इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांना याविषयी माहिती देण्यात आली.

संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादाला प्रोत्साहन ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

संयुक्त राष्ट्रांनी इस्रायलला काळ्या सूचीत टाकल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस हे इस्रायलविरुद्ध आतंकवाद आणि द्वेष यांना प्रोत्साहन देत आहेत. नेतान्याहू म्हणाले, ‘‘हमासच्या बेताल दाव्यांच्या आधारे संयुक्त राष्ट्रांनी आमचे नाव काळ्या सूचीत समाविष्ट केले आहे. असे करून सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इतिहासात स्वत:लाच काळ्या सूचीत टाकले आहे. इस्रायलचे संरक्षण दल (आय.डी.एफ्.) संपूर्ण जगात सर्वांत नीतीवान सेना आहे. संयुक्त राष्ट्रांचा कोणताही निर्णय हे वास्तव पालटू शकत नाही.’’