महापालिकेच्या उदासीनतेमुळे शहराच्या अनेक भागांत ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी !
पुणे – हवामानशास्त्र विभागाकडून महापालिकेस अनुमाने ६ घंट्यांपूर्वी पावसाचा अंदाज देण्यात येतो. यात ४ जून या दिवशी शहरात २० मि.मी.पर्यंत पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात १२० मि.मी.च्या आसपास पाऊस झाल्याने पावसाळी आपत्ती व्यवस्थापन कोलमडल्याचे समोर आले आहे. ढगफुटीसदृश पावसाने ४ जून या दिवशी शहराच्या अनेक भागांत ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी साचले. हे पाणी थेट घरांमध्ये शिरल्याने मोठी हानी झाली, तसेच रस्त्यांवर पाणी साचून वाहनांचीही हानी झाली आहे; मात्र त्यानंतरही महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी पावले उचलली गेली नाहीत, हे गंभीर आहे. (यासाठी उत्तरदायी असणार्यांची चौकशी होणे आणि संबंधितांना शिक्षा करणे आवश्यक आहे ! – संपादक)
ढिसाळ नियोजन !
महापालिका आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी सर्व क्षेत्रीय कार्यालये, तसेच संबंधित विभागप्रमुख यांना पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक सामग्री, तसेच कर्मचारी नेमणुका करण्याचे आदेश दिले होते. (असे आदेश का द्यावे लागतात ? अधिकारी स्वतःहून नियोजन करत नाहीत का ? – संपादक) पावसाचा अंदाज क्षेत्रीय कार्यालयांना कळवला जातो; पण क्षेत्रीय कार्यालयाचे अनेक कर्मचारी निवडणूक कामात होते. अनेकांनी सकाळपासून गर्दी नसल्याने कामचुकारपणा केला. त्यानंतर ढगफुटीसदृश पाऊस झाला. कर्मचारी उपस्थित नसल्याने आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजनच कोलमडले.
पथ विभाग, ड्रेनेज विभाग यांच्याकडून पहाणी
अतीमुसळधार पावसाचे व्हिडिओ ‘व्हायरल’ झाले, तसेच नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. (अशा तक्रारी का कराव्या लागतात ? – संपादक) त्यानंतर ५ जूनला सकाळपासून पथ आणि ड्रेनेज विभाग यांच्या अधिकार्यांनी पूरस्थिती उद्भवलेल्या भागात जाऊन पहाणी केली. त्यावर काय उपाययोजना करता येतील ? याचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने निर्णय घेतले जाणार आहेत.