साधनापथावर येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करून घेत असलेले प्रयत्न आणि सांगितलेल्या उपाययोजना !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. आध्यात्मिक त्रासावर मात करण्यासाठी सेवा केल्याने त्रासाचा विसर पडणे आणि सेवेच्या कालावधीत वाढ होणे

श्री. धैवत वाघमारे

‘मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्रास होत असतांना माझे मन नामजपादी उपायांत एकाग्र होत नाही. अशा वेळी मी सेवा करायला जातो. सेवेमुळे माझे मन आणि बुद्धी दोन्ही सेवेत गुंततात. त्यामुळे त्रासाचा विसर पडतो. असे घडू लागल्यामुळे सेवा करण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे.

२. साधकांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून नामजपावर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केल्याने मनातील द्वेषभावना न्यून होणे

गेले काही आठवडे मला काही साधकांचा द्वेष वाटू लागला होता. त्यांचे वागणे आणि त्यांच्या कृती यांमुळे माझ्या मनात पुष्कळ प्रतिक्रिया यायच्या. याची वारंवारता वाढल्यावर ‘हे अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा मी साधकांकडे लक्ष देण्यापेक्षा सतत नामजप करण्याकडे लक्ष केंद्रित करू लागलो. त्यामुळे माझ्या मनातील द्वेषाचे विचार घटले. आता सेवा आणि नामजप यांमुळे मनाला हलकेपणा जाणवतो.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांना चुका टाळण्यासाठी सेवेला आरंभ करण्यापूर्वी नामजप करण्यास सांगणे

मी ग्रंथ विभागात लेखांच्या संकलनाची सेवा करतो. ही सेवा करतांना माझ्या चुकांचे प्रमाण वाढले होते. मी चुकांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला; मात्र मला काहीच साध्य झाले नाही. यावर परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘याच्या मुळाशी अनिष्ट शक्तींचा त्रास आहे. तो साधनेमुळेच जाईल. त्यामुळे सेवेला आरंभ करण्यापूर्वी २० मिनिटे नामजप करायचा. आपोआप चुकांचे प्रमाण न्यून होईल.’’

४. ‘जीवनातील समस्यांच्या मुळाशी आध्यात्मिक कारणे असल्याने ती साधनेमुळेच नष्ट होतील’, याची जाणीव होणे

गेल्या ६ मासांत बरेच प्रयत्न करूनही माझ्या मनातील नकारात्मकता न्यून होत नव्हती. मुंबई येथील संगीत (तबला) अलंकार श्री. योगेश सोवनी यांच्या तबलावादनाचे काही प्रयोग महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आयोजित केले होते. त्या प्रयोगांना बसल्यावर काही घंट्यांनी मला होणारा त्रास उणावला. त्यानंतर माझे मन हलके होऊन ‘माझ्या समस्यांमागे आध्यात्मिक कारणेच अधिक आहेत आणि त्या साधनेमुळेच नष्ट होतील’, याची मला जाणीव झाली.

५. ‘राष्ट्र आणि धर्म यांची दुःस्थिती पालटण्यासाठी भावापोटी कृती करायला हवी’, याची जाणीव भगवंताने करून देणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये येणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांच्या दुःस्थितीची वृत्ते वाचून माझे मन अस्वस्थ झाले होते. २ – ३ दिवसांनी माझ्या लक्षात आले, ‘ही स्थिती पालटण्यासाठी भावापोटी कृती केली पाहिजे. भावनेपोटी केल्यास त्याचे फळ भोगावे लागेल.’ त्यानंतर माझे मन शांत झाले. यावर एकदा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘प्रत्येक सेवा करतांना आपल्याला भावापोटीच केली पाहिजे, तरच ईश्वर साहाय्य करील आणि त्यातून आपली साधना होईल.’’

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सेवा आणि नामजप न केल्यास स्वतःला शिक्षा करण्यास सांगणे

मी ३ – ४  दिवस नामजपादी उपाय केल्यावर मला सेवा करावीशी वाटते. त्यानंतर सेवा आणि नामजपादी उपाय होतात. नंतर काही दिवसांनी उपाय आणि सेवा दोन्ही बंद होतात. यावर परात्पर गुरुदेवांनी सांगितले, ‘‘सेवा झाली नाही की, स्वतःला शिक्षा करायची. त्यामुळे सेवा होऊ लागेल.’’

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी व्यायाम केल्यावर आजारी पडत असल्याने व्यायाम करण्यापूर्वी ३० मिनिटे नामजप करण्यास सांगणे

शरीर प्रकृती उत्तम रहावी; म्हणून मी व्यायाम चालू करतो. ३ – ४ दिवसांनी मला ताप येतो किंवा मी कुठेतरी पडतो किंवा माझा एखादा अवयव दुखावतो. यावर परात्पर गुरुदेवांनी एकदा सांगितले होते, ‘‘व्यायाम करण्यापूर्वी ३० मिनिटे जप करायचा. जप केल्यावर व्यायाम करायचा.’’

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.