आयुर्वेद : मानवी जीवनाचे शास्त्र

‘आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद किंवा मानवी जीवनाचे शास्त्र. त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य कसे राखावे? याचे मार्गदर्शन केले आहे. आयुष्याला हितकर आणि अहितकर आहार, विहार अन् आचार यांचे विवेचन केलेले आहे. मानवी आयुष्याचे ध्येय आणि खरे सुख कशात आहे ? याचाही विचार केलेला आहे, तसेच रोगांची कारणे, लक्षणे, उपचार आणि रोग होऊ नये; म्हणून उपाय दिलेले आहेत. याच आयुष्यातच नव्हे, तर पुढील जन्मांतही सर्वांगीण उन्नती करून मानवी जीवनाचे अंतिम ध्येय ‘‘दुःखापासून कायमची मुक्ती आणि सच्चिदानंद स्वरूपाची सतत अनुभूती’’ कसे गाठावे ? याचेही मार्गदर्शन आयुर्वेदाने केले आहे. थोडक्यात म्हणजे मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार करणारे आणि यशस्वी, पुण्यमय, दीर्घ, आरोग्यसंपन्न जीवन कसे जगावे ? याचे मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद ! आपले आरोग्य टिकवण्यासाठी सर्वांनीच आयुर्वेदांतील आरोग्याचे नियम, दिनचर्या आणि ऋतुचर्या समजून घेणे आवश्यक आहे.

मोक्षप्राप्ती – आयुर्वेदाचे अंतिम ध्येय !

रोगापासूनच नव्हे, तर भवरोगांतून म्हणजे जन्ममरणाच्या फेर्‍यातून मुक्त करून मानवाला दुःखापासून कायम मुक्त करणे आणि सच्चिदानंद स्वरूपाची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती करून देणे हेच आयुर्वेदाचे अंतिम ध्येय आहे. चरकाचार्य म्हणतात. योगसाधना करून प्रत्येकाने मोक्ष मिळवावा.

योगे मोक्षे च सर्वासां वेदनानामर्वतनम् योगो मोक्षप्रवर्तकः ।’

‘जागतिक आरोग्य संघटनेचीही आरोग्याबद्दलची व्याख्या केवळ रोग नसणे म्हणजे आरोग्य अशी नसून सर्वतोपरी म्हणजेच शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे सुखसंवेदना अनुभवण्याची अवस्था म्हणजे आरोग्य !

आयुर्वेदाचा केंद्रबिंदू

मनुष्य हा आयुर्वेदाचा केंद्रबिंदू आहे. मानवासाठीच आयुर्वेद निर्माण झाला आहे. आयुर्वेदाने उत्साही अन् आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक दिवसच योजनापूर्वक घालवावा. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले दैनंदिन व्यवहार शास्त्रशुद्ध अन् संस्कारयुक्तच असावेत यावर आयुर्वेदाने भर दिला आहे आणि शरिरात प्रत्येक अवयव आरोग्यसंपन्न रहावा, त्यासाठी काय उपाययोजना करावी, याचे शास्त्रशुद्ध विवेचनही केलेले आहे.

१. शारीरिक स्वास्थ्य

सुदृढ, बलवान, भरदार शरीर, तेजस्वी डोळे, कांतिमान त्वचा, तुकतुकीत केस, चांगली भूक, शांत झोप, श्वास, लघवी, शौच, सांध्यांच्या हालचाली, इतर अवयवांची आणि सर्व इंद्रियांची कार्ये व्यवस्थित आणि सुलभ रीतीने होणे ही शारीरिक स्वास्थ्याची लक्षणे होत.

२. मानसिक स्वास्थ्य

 अ. मनामध्ये कोणतेही दुःख किंवा तणाव नसणे.

 आ. काम, क्रोधादि षड्रिपूंवर ताबा असणे.

 इ. आपल्या ज्ञानात सतत भर टाकून प्रत्येक कृती कौशल्यपूर्ण आणि उत्साहाने करणे. आईवडील, ज्येठ आणि संत याच्याबद्दल आदर बाळगणे.

३. सामाजिक स्वास्थ्य

आपण समाजाचा एक घटक असून सर्व समाज सुखी होईल, तरच आपण सुखी होऊ, हे समजून समाजाच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी झटण्याची मनोवृत्ती असणे.

अ. कुणाबद्दल द्वेष आणि मत्सर न बाळगता सर्वांबद्दल प्रेम अन् मैत्री वाटणे.

आ. दुसर्‍यांना आपल्या कुवतीप्रमाणे साहाय्य करणे.

इ. दुसर्‍यांना चुकीबद्दल क्षमा करणे.

ई. समाजकार्यासाठी प्रतिदिन थोडा वेळ आणि पैसा देणे.

४. आध्यात्मिक स्वास्थ्य

सतत सच्चिदानंद स्वरूपात रहाणे, त्यासाठी स्वार्थ सोडून आणि सर्व विषयांबद्दलची आसक्ती सोडून निष्काम बुद्धीने समाजकार्य किंवा भगवद्भक्ती करावी. ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ति असू द्यावे समाधान ।।’ म्हणजे असेल त्या परिस्थितीत नेहमी संतुष्ट आणि समाधानी रहावे.’

– संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदाची मूलतत्त्वे’