सांगलीत विशाल पाटील यांच्या मिरवणुकीत नाचवले वाघाचे खेळणे !

विशाल पाटील

सांगली, ५ जून (वार्ता.) – सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर सांगली येथे रात्री भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. ‘आम्ही वाघ आहोत’, असे  म्हणत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फेरीच्या वाहनावर वाघांचे खेळणे (सॉफ्ट टॉय) ठेवत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. आधीच सांगली येथील ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या दारूण पराभवाचा सामना ठाकरे गटाला करावा लागला. असे असतांना हा प्रकार आघाडीतील नेत्यांमधील अंतर्गत खदखद बाहेर काढणार ठरला आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली होती; मात्र काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली. विजयानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेससमवेतच रहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.