तळेगाव – येथील रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी ‘अमृत भारत योजने’अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यात ३६ कोटी रुपये निधीची ऑनलाईन घोषणा केली, तसेच विकासकामांचे उद्घाटनही केले. संबंधित ठेकेदाराने याचे कामही चालू केले; मात्र या योजनेत समाविष्ट असलेल्या तिकीट घर, सुसज्ज फलाट, तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या सुविधा यांची कामे अर्धवट स्थितीत असून केवळ सुशोभिकरणाच्या कामांवर काही कामगार काम करत आहेत. जागोजागी खोदलेले फलाट, फलाटावर, तसेच आसपास टाकलेला राडारोडा, अस्ताव्यस्त पसरलेले बांधकाम साहित्य, अडगळीत ठेवलेले बाक, असे चित्र पहायला मिळत आहे. (याला उत्तरदायी असलेल्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक)
ठेकेदाराने पायाभूत विकासाची कामे न करता सुशोभिकरणाच्या कामांवर लक्ष केंद्रित केल्याने प्रवाशांना धोका पत्करून येथे वावरावे लागत आहे. या संदर्भात स्थानक व्यवस्थापकांची भेट घेतली असता, त्यांनी ‘या सदर्भातील माहिती त्यांच्या अधिकार कक्षात येत नाही’, असे कारण देऊन कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. रेल्वे प्रवाशांनी रेल्वे अधिकार्यांच्या नाकर्तेपणाच्या संदर्भात संताप व्यक्त केला. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयातील ‘गतीशक्ती युनिट’चे प्रमुख प्रकल्प अधिकारी (सी.पी.एम्.) उपाध्याय यांचेही स्थानकाच्या विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी संघाचे सदस्य तानाजी तोडकर यांनी केला.
रेल्वे प्रवासी संघटना या सर्व प्रकरणात गप्प का ? असा प्रश्नही संतप्त प्रवाशांनी विचारला. मुंबई-पुणे-मुंबई, तसेच लोणावळा-पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणारे विद्यार्थी, कामगार, नोकरदार यांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे तळेगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांची सतत वर्दळ असते. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुण्याच्या दिशेने जाणार्या फलाटावरील परिस्थिती पावसाळ्यात अधिक धोकादायक होईल, असे मत रेल्वे प्रवासी अनिल वेदपाठक यांनी व्यक्त केले.