दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कोल्हापूर शहरात भरधाव कारने चौघांना उडवले : ३ जण ठार; रविना टंडन यांच्या विरोधातील तक्रार खोटी ! – मुंबई पोलीस…

कोल्हापूर शहरात भरधाव कारने चौघांना उडवले : ३ जण ठार

अपघातचे CCTV छायाचित्र

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात सायबर चौक येथे भीषण अपघात झाला आहे. यात भरधाव वेगाने जाणार्‍या चारचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या गाडीने चार दुचाकीस्वारांना उडवले. यामध्ये चारचाकी चालकासह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. चारचाकी चालक हे शिवाजी विद्यापिठाचे माजी कुलगुरु असून ते आजारी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातात ४ दुचाकी आणि चारचाकी गाडी यांची पुष्कळ हानी झाली आहे.


रविना टंडन यांच्या विरोधातील तक्रार खोटी ! – मुंबई पोलीस

अभिनेत्री रविना टंडन

मुंबई – अभिनेत्री रविना टंडन यांच्यावर महिलेला मारहाण केल्याचा आरोप करत तिच्याविरोधात खार पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती; मात्र खार पोलिसांनी ही तक्रार खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘या घटनेत कुणीही घायाळ झालेले नाही. आम्ही सीसीटीव्ही चित्रण पडताळलेले आहे. रविना यांच्या गाडीने कुणालाही धडक दिलेली नाही. अभिनेत्रीही दारूच्या नशेत नव्हती’, असे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

खोटी तक्रार करणार्‍या धर्मांधांवर कारवाई कधी करणार, हेही मुंबई पोलिसांनी सांगावे !


पोलादपूर येथे भूमीला मोठ्या भेगा पडल्या !

पोलादपूर (जिल्हा रायगड) – पोलादपूर तालुक्यातील करंजे गावातील पायटेवाडी येथे भूमीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. काही घरांच्या भिंतींनाही भेगांमुळे तडे गेले. पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी घटनास्थळी पहाणी केली आहे. जवळपासच्या लोकवस्तीतील नागरिकांना अतीवृष्टीच्या काळात करंजे गावातील शाळेत, तसेच समाज मंदिरात स्थलांतरित करण्याच्या सूचनांसह त्यांचे रहाणे, जेवण, तसेच अन्य सुविधा पुरवण्याविषयी निर्देश दिले आहेत.


नवी मुंबई महापालिकेने दरडग्रस्त ठिकाणांची सूची प्रसिद्ध केली नाही !

नवी मुंबई – नवी मुंबईतील डोंगररांगाच्या पायथ्याशी असणार्‍या ठिकाणी आतापर्यंत अनेकदा छोट्या-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पावसाचे आगमन होत असतांनाही नवी मुंबई महापालिकेने अद्याप दरडग्रस्त ठिकाणांची सूची प्रसिद्ध केलेली नाही, तसेच दरडग्रस्त भागातील रहिवाशांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत.

संपादकीय भूमिका

आतापर्यंत अनेकदा दरडी कोसळलेल्या असूनही ही सूची प्रसिद्ध न होणे चिंताजनक ! यातून महापालिकेचा निष्काळजी कारभार दिसून येतो !