गांधीनगर भागातील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करा ! – राजू यादव

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस्. (उजवीकडे) यांना निवेदन देतांना राजू यादव

कोल्हापूर, ३ जून (वार्ता.) – नुकतीच विभागीय आयुक्तांनी पंचगंगा नदी स्वच्छतेच्या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. यात पंचगंगा नदी प्रदूषणाविषयी ठोस कृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. असे होऊनही अद्याप गांधीनगर, उंचगाव, वळीवडे, गडमुडशिंगी आणि चिंचवाड या गावांमधील ओढे-नाले स्वच्छ करण्यात आलेले नाहीत. तरी पावसाळ्यापूर्वी गांधीनगर भागातील ओढे, नाले, गटारी स्वच्छ करा, या मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस्. यांना दिले.

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे सर्व नाले, ओढे प्लास्टिक आणि कचरा यांनी तुडुंब भरले आहेत. पावसाळा चालू झाल्यावर हे सर्व भरून वहातात आणि हा सर्व कचरा पंचगंगा नदीत जातो. तरी ही स्वच्छता न झाल्यास पंचगंगा नदी आणखी प्रदूषित होईल. ग्रामविकास अधिकार्‍यांनी ग्रामपंचायत पातळीवर या संदर्भात कोणतीच कृती केलेली नाही. याच समवेत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ज्या ज्या होर्डिंगधारकांचा कालावधी संपला असेल, त्यांच्यावर कारवाई करावी. असे न केल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनास प्रत्येक पावसाळ्याच्या पूर्वी निवेदन का द्यावे लागते ? जनतेच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काम काय करतात ?