पुणे अपघातानंतर पब, हुक्का पार्लर यांवर पोलिसांच्या धाडी, गल्लीबोळातून दुचाकीवर रात्री गस्त !

पुणे – पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुले व्यसनांच्या आहारी जात आहेत का ? हे पडताळण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलीस शहरातील रस्ते अन् गल्ली-बोळातून दुचाकीवर रात्री गस्त घालत आहेत. या गस्तीच्या वेळी पोलीस पब, हुक्का पार्लर यांवर धाडी घालत आहेत. त्यासोबतच जिथे मुले एकत्र जमण्याची ठिकाणे (अड्डे) असतात, त्यांवरही लक्ष ठेवत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पुण्यासारखा प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ‘सीसीटीव्ही’ यांच्या साहाय्याने राज्य उत्पादन शुल्क विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार आणि रेस्टॉरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचे होणारे उल्लंघन यांवर लक्ष ठेवणार आहेत. (या कारवाईत सातत्य ठेवण्यासाठी अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. – संपादक)

पुण्यात १० दिवसांत २४३ व्यवस्थापनांची पडताळणी !

पुणे अपघात प्रकरणानंतर राज्यभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. राज्यात ९६ बार आणि रेस्टॉरंट, ‘परमिट रूम’ यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, तर किरकोळ नियमांचे उल्लघंन करणार्‍या ५६ बारवर  राज्य उत्पादन शुल्क विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. पुण्यात १० दिवसांत २४३ व्यवस्थापनांची पडताळणी करण्यात आली असून ६० बार आणि रेस्टॉरंट, परमिट रूम बंद करण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका :

या कारवाईत सातत्य रहाणार का ? याचे उत्तर पोलिसांनी जनतेला द्यावे. अवैध पब, हुक्का पार्लर यांवर कारवाई करणे, हे पोलिसांचे दायित्वच आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यावर खडबडून जागे होण्याऐवजी, असे प्रकार घडूच नयेत यासाठी उपाययोजना करण्यात खरे शहाणपण नव्हे का ?