कल्याणीनगर (पुणे) येथील ‘पोर्शे’ अपघात प्रकरण !
पुणे – येथील अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना कचर्यात फेकून अहवालात फेरफार केल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हळनोर आणि स्वच्छता कामगार अतुल घटकांबळे या तिन्ही आरोपींना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एस्.आय.टी.ने त्यांचा अहवाल शासनाला सादर केला. यानंतर या प्रकरणात तातडीने कारवाई न केल्याने आरोपी आधुनिक वैद्य आणि शिपायासह अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता ससूनचा अतिरिक्त कार्यभार हा बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांना देण्यात आला आहे.
सुनील टिंगरे, हसन मुश्रीफ यांच्या शिफारशींनुसार डॉ. तावरेंची अधीक्षक पदावर नियुक्ती केल्याचा अधिष्ठात्यांचा खुलासा !
आमदार सुनील टिंगरे यांनी ‘डॉ. अजय तावरे यांची नियुक्ती अधीक्षक पदावर करावी’, असे शिफारस पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठवले होते. त्यावर मुश्रीफ यांनी टिपणी दिल्यानंतरच डॉ. अजय तावरे यांना ससूनच्या अधीक्षक पदाचा पदभार देण्यात आला, असा खुलासा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी केला. ससून रुग्णालयात झालेली रक्ताची हेराफेरी, निलंबन आणि गदारोळ यांविषयी डॉ. काळे यांनी ससून रुग्णालयात २९ मे या दिवशी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला; मात्र काळे यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे न देता अर्ध्यावरच पत्रकार परिषद आटोपून काढता पाय घेतला आणि थेट त्यांचा कक्ष गाठला, तसेच त्यांच्या कक्षात कुणी येऊ नये, यासाठी त्यांनी बाहेर सुरक्षारक्षकांचा कडक पहारा ठेवला होता.
बाल न्याय मंडळातील पर्यवेक्षकांच्या अहवालानंतर निर्णय ठरणार !
अल्पवयीन आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्याचा आदेश बाल न्याय मंडळाने दिला आहे. त्यानंतर त्याला जामीन संमत करायचा ?, त्याला प्रौढ समजून फौजदारी खटला चालवण्यास अनुमती द्यायची कि आणखी काही दिवस बालसुधारगृहात ठेवायचे ? याचा निर्णय बाल न्याय मंडळातील पर्यवेक्षकांनी सिद्ध केलेल्या अहवालावर घेतला जाईल.
खासगी व्यक्ती कोण होती ?
अपघात घडल्यानंतर अल्कोहोल चाचणी करण्यासाठी अल्पवयीन कारचालकाला ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते; मात्र ऐन वेळी त्या ठिकाणी आलेल्या खासगी व्यक्तीने या रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केली. (ही खासगी व्यक्ती कोण ? कुणाच्या सांगण्यावरून ती रुग्णालयात आली होती ? रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला ?, याचीही चौकशी व्हायला हवी ! – संपादक)