‘आकाश सार्या ब्रह्मांडाला व्यापून आहे. आकाशात असंख्य लहान मोठे शब्द पसरलेले आहेत. देवाने आपले कान चांगलेच बहिरे केले आहेत, हे चांगले केले; अन्यथा त्या आवाजाच्या (शब्दांतील) गोंगाटाने आपले डोके फिरायची वेळ येईल. काही लोकांच्या कानात आवाज ऐकू येतात आणि ते बेचैन होतात. हे कानाची श्रवणशक्ती वाढल्याचे लक्षण आहे. आकाशवाणी केंद्र आकाशातील शब्द निवडून (फिल्टर करून) आणि विशिष्ट लहरी पकडून आपल्याला ध्वनी ऐकवते. तीच यंत्रणा आपल्या कानातही आहे. त्यामुळे अनेक आवाजातून व्यवहारातही आपल्याला ऐकायचे, तेवढेच आपण ऐकू शकतो.
सध्या तरी ध्वनीचे विद्युत्चुंबकीय लहरींतील रूपांतर (Modulation) आणि विद्युत्चुंबकीय लहरींचे ध्वनीत रूपांतर (Demodulation) हे यंत्रानेच करावे लागते; पण ते यंत्राविनाही होऊ शकते किंबहुना होणे स्वाभाविकच आहे; कारण शब्द हा आकाशाचाच विषय आहे.
१. एका महिलेला दातांच्या पोकळीत भरलेल्या सोन्यामध्ये आकाशवाणी केंद्रातील आवाज येऊ लागणे
एका रशियन सायन्स नियतकालिकामध्ये एक मजेशीर बातमी आली होती. ‘एका बाईने दातांच्या पोकळीत दंतवैद्याकडून सोने भरून घेतले. ते सोने मॉस्को आकाशवाणी केंद्रातून प्रक्षेपित होणारा नाद पकडू लागले आणि बाईच्या तोंडातून आकाशवाणी केंद्रातील आवाज येऊ लागला. बाई वैतागली. तिने दंतवैद्याकडे जाऊन ते सोने काढून घेतले; पण काय चमत्कार ! दातच आकाशवाणी केंद्रातील आवाजाची लहर पकडू लागला. अखेर तिने तो दात काढून घेतला; पण तिच्या हिरडीतूनही आकाशवाणी केंद्रातील आवाज येऊ लागला. दंतवैद्य म्हणाले, ‘‘यावर माझ्याकडे उपाय नाही. ‘रेडिओ’ दुरुस्त करणार्याकडे जा ! ’’
२. पूर्वीचे ध्वनीमुद्रण करता आले, तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता आपल्याला प्रत्यक्ष भगवंताने सांगितली, त्याच शब्दांत ऐकायला मिळेल !
आपण प्रत्यक्ष भाषण सध्या टेप (रेकॉर्ड) करू शकतो; पण तासा-दोन घंट्यांपूर्वीचे भाषणही टेप करण्याचे प्रयत्न परदेशात चालू आहेत. अर्थात् असे ध्वनीमुद्रण करता येऊ लागले, तर घंट्यांचेच का, वर्ष-दोन वर्षांचे नव्हे, तर सहस्रो वर्षांपूर्वीचे ध्वनीही आपल्याला ऐकायला मिळू शकतील. असे झाले, तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता आपल्याला प्रत्यक्ष भगवंताने सांगितली, त्याच शब्दांत ऐकायला मिळेल !’
– भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे
(साभार : ग्रंथ ‘कृतकर्मांची फळे कशी मिळतात ?’)