ईश्वरप्राप्तीसाठी समर्पण भाव कसा असायला हवा ?

एक शिकारी शिकारीसाठी जंगलात गेला. त्याला हवी ती शिकार मिळेना. तो कंटाळून जंगलात सावज शोधत फिरत होता. तिथे त्याला एक झोपडी दिसली. तेथे एक साधू महाराज बसले होते. त्यांच्या समाधीत व्यत्यय आणत शिकारी झोपडीत शिरला. त्याने विचारले, ‘तुम्ही इथे का रहाता ?’ साधू महाराज थोडक्यात उत्तर आटोपण्यासाठी म्हणतात, ‘मीही शिकारीच आहे. माझ्या सावजाची वाट बघत मी इथे थांबलो आहे !’ शिकारी कुतूहलाने म्हणाला, ‘कुणाची शिकार करणार आहात ? माझी शिकार मला मिळत नाही, तर निदान तुमची शिकार शोधण्यास साहाय्य करीन.’ साधू महाराज मनात म्हणतात, ‘याच्याकडून सोडवणूक करायला खोटे बोललो, तर याने आणखीनच खोटे बोलायला भाग पाडले.’ शिकारीने वर्णन विचारले. त्यावर साधू महाराज म्हणाले, ‘माझे सावज सावळ्या रंगाचे आहे. त्याच्या डोक्याला मोरपीस आहे. ते कुणाच्या हाती लागत नाही.’ शिकारी म्हणाला ‘मी शोधून आणतो. तुम्ही शांत चित्ताने झोपडीतच थांबा.’

पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

यानंतर साधू महाराज हसत पुन्हा तपश्चर्येत मग्न झाले. शिकारी सावजाच्या शोधात निघाला. त्याने त्या सावजाचा ध्यासच घेतला. दिवस-रात्र जंगल पिंजून काढले. पाण्याचा थेंबसुद्धा ग्रहण केला नाही. खाण्याची भ्रांत राहिली नाही. असे ४ दिवस गेले. शेवटी श्रीकृष्णाला दया आली. त्याचा भोळाभाव पाहून कृष्णाने त्याला दर्शन दिले. शिकारी आनंदी झाला. तो कृष्णाचा हात धरून त्याला साधू महाराजांकडे घेऊन आला. साधू महाराज आश्चर्यचकित झाले. ते श्रीकृष्णाला नमस्कार करून म्हणाले, ‘देवा, एवढी वर्षे जंगलात राहून मी तुझे ध्यान करत आहे; पण तू मला न भेटता या शिकार्‍याला भेटला. ते कसे काय ?’ श्रीकृष्ण म्हणाला, ‘शिकारी इतर कोणत्याही विषयांचा विचार न करता माझा ध्यास घेत, स्वतःची तहानभूक विसरला होता. ध्येय प्राप्तीसाठी जो कुणी एवढे समर्पण करतो, त्यालाच मी प्राप्त होतो. तुम्ही एवढी वर्षे ध्यान करत असला, तरी इतर विषयांमुळे तुमचे मन विचलित होते. याउलट या शिकार्‍याने पूर्ण समर्पित भाव ठेवून मला प्राप्त करून घेतले.’ नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा आणि ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते; म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.

(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून साभार)