Exchange Kartarpur For kashmir : (म्हणे) ‘भारताने कर्तारपूर साहिबच्या बदल्यात काश्मीर पाकला द्यावे !’

पाकचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचे विधान !

कर्तारपूर साहिब गुरुद्वारा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतात रहाणारे शीख अनेकदा कर्तारपूर साहिब गुरुद्वारा परत घेण्याची मागणी करतात; पण आता तसे होऊ शकत नाही. जर त्यांनी काश्मीरच्या बदल्यात आमच्याकडून कर्तारपूर साहिब मागितला, तर त्यावर विचार करता येईल, असे विधान पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केले. ते एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते. या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पंजाबच्या पतियाळा येथील प्रचारसभेत बोलतांना ‘वर्ष १९७१ च्या युद्धाच्या वेळी मी पंतप्रधान असतो, तर पाकमध्ये असलेले कर्तारपूर गुरुद्वारा परत मिळवला असता’, असे विधान केले होते. त्यावरून बासित यांनी वरील विधान केले.

अब्दुल बासित

कर्तारपूर साहिब गुरुद्वाराची माहिती

कर्ताररपूर साहिब हे पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यात रावी नदीजवळ आहे. त्याचा इतिहास ५०० वर्षांहून अधिक जुना आहे. शीख पंथाचे संस्थापक गुरु नानक यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस येथे घालवले आणि येथेच त्यांनी देहत्याग केला. त्यामुळे शिखांसाठी या शहराला विशेष महत्त्व आहे. कर्तारपूर कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) ९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी उघडण्यात आला. हा मार्ग पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक मंदिराला जोडतो.

संपादकीय भूमिका

संपूर्ण पाकिस्तानच भारताचा एक भाग होता आणि पुन्हा तो भारताशी जोडला जाणार आहे. त्यामुळे अब्दुल बासित यांच्यासारख्यांनी अशा प्रकारची विधाने करण्यापेक्षा त्यांचे अस्तित्व टिकून ठेवण्याचाच आता विचार करावा !