भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांना सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक राम होनप यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली अभ्यासपूर्ण उत्तरे !

‘२२.५.२०२४ या दिवशी मला भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. तेव्हा मी त्यांना विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

१. प्रा. सु.ग. शेवडे बोलत असतांना साधकाला देवीचे स्मरण आपोआप होण्यामागील त्यांनी सांगितलेले कारण

मी : आपण बोलत असतांना माझा ‘भगवती’ हा नामजप चालू झाला, तसेच देवीचे स्मरणही अधूनमधून आपोआप होऊ लागले. त्यामागील कारण काय ?

प्रा. सु.ग. शेवडे : माझ्यावर देवीची कृपा आहे. मी देवीचा भक्त आहे. मी गेली ५० वर्षे देवीची उपासना करत आहे.

श्री. राम होनप

२. प्रा. सु.ग. शेवडे यांच्या जिभेवर सरस्वतीदेवीचा वास असल्याने साधकाला त्यांचे बोलणे ऐकत रहावेसे वाटणे आणि त्यांनी याला दुजोरा देणे

मी : आपल्या जिभेवर सरस्वतीदेवीचा वास असल्याने आपले बोलणे ऐकत रहावेसे वाटते आणि आनंदाची अनुभूतीही येते.

प्रा. सु.ग. शेवडे : हो. त्यामुळे माझ्या बोलण्यात कधीही अपशब्द येत नाहीत.

३. उतारवयातही आनंदी आणि उत्साही असण्यामागील प्रा. सु.ग. शेवडे यांनी सांगितलेले रहस्य !

मी : आपले वय ९० वर्षे असले, तरीही आपण पुष्कळ उत्साही आणि आनंदी दिसता. त्यामागील रहस्य काय ?

प्रा. सु.ग. शेवडे : ईश्वरनिष्ठा ! ‘सर्वकाही ईश्वरेच्छेने घडत आहे’, असा माझा भाव सतत असतो.

४. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानीदेवीने प्रत्यक्षात तलवार दिल्याचा प्रसंग सत्य आहे !

मी : एका लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक पुस्तक लिहिले. त्यात त्याने लिहिले आहे, ‘राज्यावर सर्व बाजूंनी मोठी संकटे होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे निराश झाले होते. ‘त्यांना उभारी यावी’, यासाठी महाराजांनी युक्ती करून मावळ्यांना सांगितले, ‘‘दुष्टांचा संहार व्हावा आणि स्वराज्याची स्थापना व्हावी’, यांसाठी ‘प्रत्यक्ष भवानीदेवीने मला तलवार दिली आहे.’’ त्यामुळे मावळ्यांमध्ये उत्साह संचारला.’ ‘भवानीदेवीने प्रत्यक्षात महाराजांना तलवार दिली नव्हती’, असे लेखकाला म्हणायचे होते. याविषयी सत्य काय आहे ?

प्रा. सु.ग. शेवडे : भवानीदेवीने छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्यक्षात तलवार दिल्याची घटना सत्य आहे; परंतु तो लेखक देवीला मानत नाही. त्यामुळे त्याने हा भाग नाकारत केवळ महाराजांचा चांगला भाग सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

५. समर्थ रामदासस्वामी अवतार असल्याने त्यांचे गुरु प्रत्यक्ष प्रभु श्रीराम आहेत !

मी : समर्थ रामदासस्वामी यांना देहधारी गुरु नव्हते. त्यांचे गुरु प्रत्यक्ष प्रभु श्रीराम होते. याविषयी वास्तव काय आहे ?

प्रा. सु.ग. शेवडे : समर्थ रामदासस्वामी यांना देहधारी गुरु असल्याचे माझ्या वाचनात नाही. समर्थ रामदासस्वामी हे अवतारी होते. त्यामुळे त्यांचे गुरु प्रत्यक्ष प्रभु श्रीराम असू शकतात. जर कुणाला प्रत्यक्ष भगवंतच गुरुरूपात प्राप्त होत असतील, तर तो हे कसे नाकारेल ?’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२४)