उतारवयातही साधनेने स्वतःमध्ये आमूलाग्र पालट घडवून आणून आध्यात्मिक प्रगती करणारे अकोला येथील (कै.) श्यामसुंदर राजंदेकर !

१६.५.२०२४ या दिवशी अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. २९.५.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १४ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. श्यामसुंदर राजंदेकर

(कै.) श्यामसुंदर राजंदेकर यांच्या पार्थिवाची छायाचित्रे पाहून त्यांचा नातू सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे !

पू. वामन राजंदेकर

१. ‘नारायण (परात्पर गुरु डॉ. आठवले) आजोबांजवळ सूक्ष्मातून आहेत.
२. आजोबांच्या देहाभोवती नारायणाचे संरक्षककवच आहे.
३. त्यांच्या भोवती निळ्या आणि पिवळ्या रंगाचा प्रकाश आहे.’
– (पू.) वामन राजंदेकर, फोंडा, गोवा. (२१.५.२०२४)

१. सौ. माया श्रीकांत पिसोळकर ((कै.) श्यामसुंदर राजंदेकर यांची भाची (बहिणीची मुलगी)), अकोला

१ अ. साधनेचे महत्त्व पटल्यावर लगेच साधनेला आरंभ करणे : ‘वर्ष १९९८ मध्ये मी आणि माझे यजमान श्री. श्रीकांत पिसोळकर सनातन संस्थेच्या सत्संगाला जाऊ लागलो. एकदा मामांच्या (श्याम राजंदेकर यांच्या) घराजवळ असलेल्या शाळेमध्ये सनातनचे प्रवचन आयोजित केले होते. आम्ही मामांना प्रवचन ऐकायला बोलावले. तेव्हा मी मामांना म्हणाले, ‘‘तुम्ही निवृत्त झाला आहात. त्यामुळे तुम्ही तुमचा पूर्णवेळ साधनेसाठी देऊ शकता.’’ त्यांना हे पटले आणि त्यांनी साधनेला आरंभ केला.

१ आ. प्रेमभाव : साधकांना मामांविषयी जवळीक वाटत असे. मामा प्रत्येक साधकामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप पहात असत. ते घरी आलेल्या साधकांना प्रसाद देत असत.’

२. श्री. अनिरुद्ध राजंदेकर (पुतण्या, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४१ वर्षे), फोंडा, गोवा.

२ अ. ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न करणे : ‘काकांचा स्वभाव निश्चयी होता. साधनेत आल्यापासून त्यांनी नेहमीच ध्येय ठेवून प्रयत्न केले. त्यांची पत्नी कै. (सौ.) विमलकाकू (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांची आध्यात्मिक उन्नती झाल्यानंतर त्यांच्या प्रकर्षाने लक्षात आले, ‘देवाजवळ जाण्यासाठी केवळ स्वतःमध्ये पालट करणे अपेक्षित आहे.’ त्यानंतर त्यांनी निश्चय करून साधनेचे प्रयत्न जोमाने चालू केले.

२ आ. उतारवयातही तळमळीने सेवा करणे : काकांनी अकोला येथे तरुणांना लाजवेल, अशी अध्यात्मप्रसाराची सेवा केली. त्यांनी काही कालावधीसाठी देवद (पनवेल) आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमांत सेवा केली. त्यांनी उत्तरदायी साधक सांगतील ती आणि ते सांगतील त्या ठिकाणी सेवा केली. उतारवयातही त्यांनी कसलीही सवलत घेतली नाही. ‘गुरुदेवांनी आपल्याला अधिकाधिक सेवा करण्याची संधी दिली आहे. ती आपण करायची. आपला देह आणि मन गुरुचरणी अर्पण करायचे’, असे ते सांगत असत.

२ इ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. काकांचे निधन झाल्याचे समजल्यावर मला त्रासदायक स्पंदने जाणवली नाहीत.

२. ‘त्यांची साधना चालू असून ते साधनेत पुष्कळ पुढे गेले आहेत’, असे मला वाटले.’

३. सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर ((कै.) श्यामसुंदर राजंदेकर यांची सून (पुतण्याची पत्नी), आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे), फोंडा, गोवा.

३ अ. स्वतःमध्ये आमूलाग्र पालट घडवून आणून आध्यात्मिक प्रगती करणे : ‘पूर्वी काकांना पुष्कळ राग यायचा; पण नंतर त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया मनापासून राबवली, तसेच त्यांनी नामजप आणि भावपूर्ण सेवा केली. त्यांनी स्वतःमध्ये आमूलाग्र पालट घडवून आणला आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती गतीने झाली.

३ आ. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे : काकांमध्ये उत्तम साधकत्व होते. ते मला साधनेसाठी प्रोत्साहन द्यायचे. मला त्यांचा नेहमीच आधार वाटायचा. ते कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या चुका आणि स्वभावदोष यांची जाणीव करून देत असत.

३ इ. संतांप्रतीचा भाव

१. अकोला येथे त्यांच्या घरी पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७४ वर्षे) यांचे सेवेनिमित्त येणे होत असे. संत घरी येणार असल्याचे कळल्यावर काका स्वतः उत्साहाने सर्व सिद्धता करायचे. ते पू. पात्रीकरकाकांचे आज्ञापालन करायचे.

२. माझा मुलगा पू. वामन (पू. वामन राजंदेकर, सनातनचे दुसरे बालसंत, वय ५ वर्षे) यांच्याप्रती काकांचा पुष्कळ भाव होता. खरेतर काका पू. वामन यांचे आजोबा होते; परंतु ते नेहमीच पू. वामन यांच्याशी ‘बालसंत’, असा भाव ठेवून बोलायचे.

३ ई. निधनानंतर पार्थिवाची छायाचित्रे बघतांना जाणवलेली सूत्रे

१. काकांची छायाचित्रे पाहिल्यावर माझ्या मनाला शांतता आणि स्थिरता जाणवली. काकांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य आणि तेज जाणवले.

२. ‘त्यांच्या चरणांमधून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.

३. ‘काकांचा नामजप चालू असून ते प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले.’

४. कु. श्रिया राजंदेकर ((कै.) श्यामसुंदर राजंदेकर यांची नात (पुतण्याची मुलगी), आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १३ वर्षे)

४ अ. पार्थिवाची छायाचित्रे पाहून जाणवलेली सूत्रे

१. ‘आजोबांच्या भोवती पिवळा प्रकाश आहे’, असे मला जाणवले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २१.५.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक