संपादकीय : द्वेष आणि पूर्वग्रह सोडा !

राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (‘एस्.सी.ई.आर्.टी.’ने) शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्राच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर वादाचे मोहोळ उठून गदारोळ झाला नसता, तरच नवल होते. असो. समाज आता जागृत होत आहे आणि जागृत समाजाची पुरोगाम्यांकडून दिशाभूल होऊ नये म्हणून पुरोगाम्यांच्या प्रत्येक हिंदुद्वेषी विधानाचे खंडण करणे आवश्यक ठरते.

मनुस्मृतीवर टीका करणार्‍यांनी प्रथम २ महत्त्वाची सूत्रे लक्षात घेतली पाहिजेत. एक म्हणजे मूळ मनुस्मृति ६८४ श्लोकांची आहे आणि त्यात २ सहस्र ४०० श्लोक हे नंतर आलेले आहेत. इंग्रजांनी या देशाची बलस्थाने ओळखल्यावर आणि ‘या देशाला हरवणे शक्य नाही’, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जे ‘फोडा आणि झोडा’ राजकारण अवलंबले, त्यात प्रामुख्याने जातीभेद वाढवणे अन् पसरवणे यांसाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या. त्यांपैकीच मनुस्मृतीत श्लोक घुसडवणे ही एक गोष्ट होती. दुसरी गोष्ट म्हणजे मनुस्मृतीमध्येच म्हटले आहे, ‘कलियुगात ‘पराशरस्मृती’चा आधार घ्यावा.’ त्या त्या काळानुसार समाजाची ठेवण असते. हिंदु धर्म लवचिक आणि सर्वसमावेशक असल्याने काळानुसार होणारे आवश्यक पालट तो स्वीकारतो, म्हणूनच ‘नित्य नूतनः इति सनातनः ।’ म्हणजे ‘सनातन धर्म नित्यनूतन आहे’, असे म्हटले आहे; परंतु त्याचसमवेत मूलभूत सनातन सत्य असलेली (धर्म)तत्त्वे मात्र चिरंतन असतात; म्हणूनच सनातन हिंदु धर्म काळाच्या पटलावर सहस्रो वर्षे टिकून आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. हा विरोधाभास नसून ज्ञानग्रहणाचा विषय आहे.

सामान्य ज्ञानाचा अभाव !

‘मनु यांनी स्त्रियांवर आणि खालच्या जातीतील लोकांवर अन्याय केला’, या आशयाची विधाने करतांना पुरोगाम्यांनी काही सामान्य ज्ञानाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ‘आपल्या घरातील आजी, पणजी, खापरपणजी या समाजजीवनातील बंधनांमुळे अन्यायकारक जीवन जगत होत्या, असे आपण म्हणू शकतो का ?’ जर असे असते, तर ते आपल्या लक्षात आले असते. प्राचीन काळापासून क्षत्रिय, ब्राह्मण, शेतकरी यांसह १२ बलुतेदारांच्या पत्नी त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सर्वतोपरी साथ देत घर चालवत आणि कर्तृत्व गाजवतच होत्या. ‘काळानुसार इंग्रजी शिक्षण घेऊन त्या नोकरी करू लागल्या; म्हणजे त्या आता स्वतंत्र झाल्या आणि मनूने इतकी वर्षे त्यांना जखडून ठेवले होते’, असे मानणे हे पुरोगाम्यांच्या बुद्धीची कीव करण्यासारखे आहे. १८ व्या शतकातील सर्व जातींचे विद्यार्थी आणि मुली यांचा सहभाग असलेल्या गुरुकुलाची संख्यात्मक व्याप्ती प्रत्यक्ष इंग्रजांनीच त्यांच्या तत्कालीन संसदेत वर्णन केली आहे. हीच पद्धत प्राचीन काळापासूनच चालत आली होती. इंग्लडमध्ये पहिली शाळा वर्ष १८११ मध्ये निघाली, तेव्हा भारतात ७ लाख ३२ सहस्र गुरुकुले होती. त्यामुळे ब्राह्मणांनी कुणालाही शिक्षण वर्ज्य केले होते, असे नाही. भारतात वर्णाश्रमपद्धती असल्याने बहुसंख्य ऋषी हे मूलतः ब्राह्मण नसूनही त्यांनी ‘ऋषीपद’ प्राप्त केले होते. नालंदा, तक्षशिला यांसारख्या ८ विद्यापिठांची उन्नत संस्कृती जिथे उभी रहाते, तिथे समाजाचा अर्धा घटक असलेल्या सर्व स्त्रिया मागासलेल्या रहात नाहीत, एवढे तरी सामान्यपणे लक्षात घेतले पाहिजे. वेदांतील ज्ञान समजून घेण्यासही बंधने नव्हती; मात्र वेद म्हणण्यावर निश्चित बंधने होती आणि ती अत्यावश्यक होती; कारण त्याचे चुकीचे उच्चारण आणि त्यातील ज्ञानाचा, शक्तीचा अयोग्य वापर अतिशय घातक ठरू शकतो. या अर्थाने ‘धर्माने सर्वांवरच घातलेली बंधने उपकारक होती’, हे लक्षात घेतले पाहिजे. आज प्रयोगशाळा, शस्त्रक्रियागृह, धोकादायक प्लांट, इतकेच काय कुठलीही शाळा किंवा रुग्णालय, कार्यालय येथेही बंधने, नियम असतात. यामुळे कुणावर अन्याय होत नसून ‘समाजव्यवस्था चालण्यासाठीची ती अत्यावश्यक शिस्त असते’, हे समजून घेतले पाहिजे. काही अपवादात्मक ठिकाणी कुणावर अन्याय झालेला असू शकतो; परंतु ‘युगानुयुगे ब्राह्मणांनी मनुस्मृतीच्या आधारे अन्यांवर अन्याय केला असे मानणे’, हे अतिशय हास्यास्पद आहे.

मनुस्मृति अभ्यासणे आवश्यक !

जितेंद्र आव्हाड

मनुस्मृति ही केवळ वाचणे नव्हे, तर अभ्यासणे आवश्यक आहे. एका संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ असतात. त्यामुळे त्या काळात ऋषिमुनींना तसे का म्हणायचे आहे ? हे जर समजून घेतले, तर स्त्रियांसाठी मनुस्मृति किती अधिक प्रमाणात उपकारक आहे, हे लक्षात येऊन कृतज्ञता वाटल्याविना रहाणार नाही. ‘आज स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांचे भयावह प्रमाण लक्षात घेता त्यांच्यावरील तत्कालीन बंधने ही बंधने नसून त्यांच्यासाठी किती आदर्श जीवनपद्धत होती’, हे लक्षात येईल. धर्मग्रंथांतील ज्ञानाचा अर्थ आकलन होण्यासाठी जिज्ञासू वृत्ती आणि सात्त्विकता अन् साधना लागते. केवळ हिंदुद्वेषाची झापडे लावून त्यातील ज्ञान आकलन होत नाही. मनु यांनी स्त्रीला पैशांच्या व्यवहाराच्या संदर्भात अधिकार दिले आहेत. अशा प्रकारे अधिकार देणारा जगात कुठलाही प्रांत किंवा धर्म नाही. पत्नी ही गृहिणी, सखी, प्रिया, शिष्या आणि सचिव असल्याचे मनु यांनी सांगितले आहे. मनु यांनी स्त्रीच्या संरक्षणाला अधिक महत्त्व दिले आहे. ‘प्रसंगी ब्राह्मणानेही हाती शस्त्र घेऊन लढले, तरी चालेल; पण स्त्रीचे रक्षण कुठल्याही परिस्थितीत करावे’, असे मनु यांनी मनुस्मृतीच्या ९ व्या अध्यायात म्हटले आहे; आता एखादा आपल्या रक्षणाचा सर्वस्वी भार घेतो, तेव्हा त्याच्या तंत्राने वागणे, त्याच्या बंधनात रहाणे, हे ओघाने येतेच. यात अयोग्य काय आहे ? हिंदुद्वेषाचे भयंकर आवरण आलेल्यांना तिचा गर्भितार्थ कळेल, अशी अपेक्षा नाही; परंतु कुठलाच सखोल अभ्यास नसतांना समाजाची दिशाभूल मात्र पुरोगाम्यांनी ज्या जोरकसपणे चालवली आहे, त्यामुळे समाजाची हानी होऊ नये; म्हणून त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणे भाग पडते. एरव्ही ‘विचारांचा प्रतिवाद विचारांनी’ म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड मनुस्मृति जाळायला निघतात, तेव्हा त्यांना मात्र हिंसक प्रतिवादाची मुभा घटनेने दिलेली असते का ? अर्थात् आव्हाड यांची हिंसक कृती करण्याची पार्श्वभूमी आहे. पू. भिडेगुरुजींवरील व्यासपिठावरील आक्रमण असेल किंवा श्रीशिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याला फसवून पोलिसांकडून करवून घेतलेल्या मारहाणीच्या आरोपाचे प्रकरण असेल; परंतु हिंदुत्वनिष्ठ आता जागृत झाल्याने अशा हिंसक मार्गांचा अवलंब त्यांनी करू नये, हेच केव्हाही उचित ठरेल !

मनुस्मृती जाळण्याची मोहीम उघडणारे अन्य पंथियांतील स्त्रियांच्या घोर दुःस्थितीविषयी ‘ब्र’ही उच्चारत नाहीत !