‘खबर हलचल’ वृत्तसंकेतस्थळाकडून इंदूर येथे ‘स्वच्छ मंदिर समृद्ध मंदिर’ मोहीम !

  • मोहिमेचे शहरात सर्वत्र कौतुक !

  • प्रबोधनात्मक फलक ठरता आहेत लक्षवेधी !

  • वृत्तसंकेतस्थळाचे संपादक डॉ. अर्पण जैन यांचा पुढकार !

इंदूर शहरातील विविध मंदिरांमध्ये फलक लावतांना कार्यकर्ते

इंदूर (मध्यप्रदेश) – देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून बहुमान मिळालेल्या इंदूरमध्ये निष्पक्ष पत्रकारिता करणार्‍या ‘खबर हलचल’ या वृत्तसंकेतस्थळाने मंदिरांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. या दृष्टीने ‘स्वच्छ मंदिर समृद्ध मंदिर’ ही मोहीम चालू करण्यात आली आहे. यांतर्गत मंदिरांची स्वच्छता राखण्याचे आवाहन करणारे फलक मंदिरांमध्ये लावण्यात येत आहेत, तसेच मंदिरे स्वच्छ करण्यात येत आहेत. या मोहिमेचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

इंदूर शहरातील विविध मंदिरांमध्ये फलक लावतांना कार्यकर्ते

‘खबर हलचल’चे संपादक डॉ. अर्पण जैन ‘अविचल’ म्हणाले, ‘‘भक्तगण धूप आणि अगरबत्ती यांची पाकिटे, तसेच फुले मंदिरात कुठेही फेकतात. कुंकवाने माखलेली बोटे भिंतींवर पुसून भिंती खराब करतात. त्यामुळे देवाचे घर अस्वच्छ होते. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठीच ‘स्वच्छ मंदिर-समृद्ध मंदिर’ मोहीम चालू करण्यात आली आहे. ‘मी तुमचे घर अस्वच्छ करत नाही, मग तुम्ही माझे घर अस्वच्छ का करता ? ’, अशा आशयाचे प्रबोधनात्मक फलक आम्ही सिद्ध केले असून ते फलक शहरातील विविध मंदिरांत लावले आहेत.

इंदूर शहरातील विविध मंदिरांमध्ये फलक लावतांना कार्यकर्ते

संपादकीय भूमिका

  • मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी पुढकार घेऊन कृती करणार्‍या ‘खबर हलचल’ वृत्तसंकेतस्थळाचे संपादक डॉ. अर्पण जैन यांचे अभिनंदन ! हल्लीच्या तथाकथित निधर्मी प्रसारमाध्यमांमध्ये अशी धर्माभिमानी वृत्तसंकेतस्थळे आणि संपादक असणे, हा हिंदूंसाठी आशेचा किरण !
  • हिंदूंनी अशा मोहिमांमध्ये पुढाकार घेऊन स्वत:हून सहभागी व्हावे आणि धर्मरक्षणाच्या कार्याला हातभार लावावा !