स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपेक्षित जगतो का ? याचा विचार करूया !  – राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल, बिहार

मुंबईमध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार-२०२४’ चे वितरण !

डावीकडून रणजित सावरकर, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना विद्याधर नारगोलकर, बाजूला प्रवीण दीक्षित

मुंबई, २७ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तीमत्त्व आपणाला प्रेरक वाटते. त्यावरील विविध कार्यक्रमांनाही आपण उपस्थित रहातो; परंतु त्यांना अपेक्षित असे जीवन आपण जगतो का ? याचा विचार करूया, असे आवाहन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी उपस्थितांना केले. २६ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०२४’ चे वितरण राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने शौर्य, स्मृतीचिन्ह, विज्ञान या पुरस्कारांसह विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारका’चे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांसह सत्कारमूर्ती उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पुरस्कारची रक्कम या स्वरूपात मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ ‘वन्दे मातरम्’ने झाला. त्यानंतर वीर सावरकरलिखित ‘जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे’ या गीताचे गायन झाले. स्मारकांच्या वतीने बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला. रणजित सावरकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. पुरस्कार वितरणानंतर पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपूर्वा कुलकर्णी यांनी केले. कर्नल सचिन निंबाळकर देशाच्या सुरक्षेच्या सेवेत असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

पुरस्काराचे खरे मानकरी !

१. कर्नल सचिन निंबाळकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार !

राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान, तसेच ‘ऑपरेशन विजय’ आणि ‘टायगर हिल’ सैन्य दलातील महत्त्वपूर्ण कामगिरीकरता यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

२. आयआयटी, इंदूरचे संचालक डॉ. सुहास जोशी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार !

यंत्रनिर्मिती क्षेत्रात सातत्याने संशोधन, नवनिर्मितीवर भर, तसेच उत्पादन, यांत्रिक प्रक्रियांचा विकास, अल्ट्रा-स्मॉल लेसर मेकॅनिक्स, लिगा आणि नॅनो पॉलिशिंग अभियांत्रिकी क्षेत्रात अद्वितीय योगदान, तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील अमूल्य कार्यासाठी डॉ. सुहास जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

३. महाराष्ट्र राज्य मल्लखांब असोसिएशनचे सचिव विद्याधर नारगोलकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे प्रचारक आणि प्रसारक, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या कालावधीत मल्लखांब आणि कुस्ती यांसारख्या भारतीय खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नासाठी श्री. विद्याधर नारगोलकर यांना स्वातंत्र्यवीर स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात आला.

४. अभिनेते रणदीप हुड्डा यांना स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्कार !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट साकार करून सत्य इतिहास लोकांपुढे आणल्याबद्दल ‘वीर सावरकर’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांना स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.