‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या महिलेच्या बाळाची प्रियकराने केली हत्या !

राजेश राणा

मुंबई – ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या महिलेच्या १५ महिन्यांच्या बाळाची तिच्यासमोरच प्रियकराने लाथा-बुक्के मारून निर्घृण हत्या केली. जोगेश्वरी येथे हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी राजेश राणा (वय २८ वर्षे) आणि त्याची प्रेयसी रिंकी दास (वय २३ वर्षे) यांना अटक केले आहे.

रिंकी दास

बाळाची हत्या केल्यावर राजेश राणा याने मृतदेह आरे कॉलनीतील एका नाल्यात फेकून दिला. राजेश राणा आणि रिंकी दास हे दोघेही ओरिसा राज्यातील रहाणारी असून ४ महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये आले. रिंकी दास हिचा यापूर्वी विवाह झाला असून तिला एक मुलगा आहे; मात्र विवाहानंतर तिने नवर्‍याचे घर सोडले. त्यानंतर स्वत:च्या काकांसमवेत तिचे प्रेम जमले. त्यातून रिंकी दास गर्भवती राहिली. त्या वेळी काका घरातून पळून गेले. त्यानंतर रिंकी दास गावातीलच राजेश राणा याच्या प्रेमात पडली. दोघेही मुंबईमध्ये रहायला आले; मात्र काकापासून झालेल्या मुलाचा अडथळा होत असल्यामुळे राजेश राणा याने मुलाची हत्या केली. बाळाच्या हत्येनंतर राजेश राणा आणि रिंकी दास यांनी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली; मात्र पोलिसांना संशय आला. पोलिसांनी राजेश राणा आणि रिंकी दास या दोघांची चौकशी केल्यावर दोघांच्या उत्तरामध्ये भिन्नता असल्याचे आढळून आले. अधिक चौकशी केल्यावर राजेश राणा याने बाळाची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला.

संपादकीय भूमिका 

समाजातील ढासळणारी नीतीमत्ता राखण्यासाठी नैतिक मूल्यांधिष्ठीत धर्मशिक्षणाविना पर्याय नाही !