पुणे येथील ‘पोर्शे’ अपघाताच्या प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक !

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक

पुणे – कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ अपघातातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २५ मे या दिवशी अटक केली. त्यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणांमधील ही ७ वी अटक आहे. अपघात झाला, त्या वेळी अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता. त्याच्या शेजारी चालक गंगाराम पुजारी बसला होता. मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार यांनी चालकाला डांबून ठेवले. स्वत:वर गुन्हा घेण्याचा दबाव टाकला. योग्य तो जबाब देऊ दिला नाही किंवा तसा प्रयत्न केला. हा पुराव्याशी छेडछाड करण्याचा आणि गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. चालकाने दिलेल्या जबाबात या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणाचे अन्वेषण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. यानंतर लगेच आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई करून त्यांना कह्यात घेण्यात आले आहे. सुरेंद्रकुमार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या ते येरवडा कारागृहामध्ये आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया !

रवींद्र धंगेकर यांनी केलेले आरोपी मी माध्यमांमध्ये वाचले. याविषयी पोलीस आयुक्तांशी चर्चाही केली. मुळात अशा प्रकारे आरोप केले असतील, त्यांनी त्याचे पुरावे सादर करणेही आवश्यक आहे. बिनबुडाचे आरोप करून काहीही साध्य होणार नाही. कुणीही असे आरोप करत राहिले, तर पोलिसांना त्यांचे काम करणे कठीण होईल. उगाचच ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे करू नये.

सरकारी अधिवक्त्यांची चौकशी व्हावी ! – डॉ. नीलम गोर्‍हे

अपघातातील आरोपी १७ वर्षे ८ महिन्यांचा असल्याने त्याला बाल न्याय मंडळासमोर उपस्थित केले. त्या वेळी सुनावणीच्या वेळी सरकारी अधिवक्त्यांनी आरोपीच्या जामिनाला विरोध करणे अपेक्षित होते. त्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे आरोपीला जामीन मिळाला. याविषयी संबंधित सरकारी अधिवक्ता आणि जिल्हा सरकारी अधिवक्ता यांची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले आहे.