सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्या त्या त्या वेळच्या छायाचित्रावरून त्यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास !

या लेखामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे वर्ष १९८३, म्हणजे त्यांनी साधनेला प्रारंभ केला, तेव्हापासून ते वर्ष २०२२, म्हणजे सप्तर्षींनी त्यांना जेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म’ घोषित केले, त्या कालावधीतील साधनेचे घटक दिले आहेत. त्यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्या त्या त्या वेळच्या छायाचित्रावरून त्यांच्यातील साधनेतील घटकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या या लेखात वर्ष १९८३ ते वर्ष १९९५ या कालावधीतील त्यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास मांडला असून वर्ष १९८७, वर्ष १९९१ आणि वर्ष १९९५ मधील छायाचित्रे दिली आहेत. (छायाचित्रे ओळीने पहावीत)                   

(भाग १)

१. वर्ष १९८३ मध्ये सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधनेला आरंभ करणे आणि त्यांना २४.७.१९८७ या दिवशी गुरुप्राप्ती होणे

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९८३ मध्ये अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाला आरंभ केला. त्यासाठी त्यांनी अध्यात्मातील अधिकारी असलेल्या २५ हून अधिक संतांकडे जाऊन अध्यात्मशास्त्रातील तात्त्विक आणि प्रायोगिक अंगे जाणून घेतली. या अभ्यासातून अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यावर त्यांनी संतांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः साधनेला आरंभ केला. साधनेमध्ये गुरु हे करायचे नसतात, तर आपण साधना करू लागलो की, योग्य टप्प्याला गुरु आपल्या जीवनात आपोआप येतात. त्याचप्रमाणे २४.७.१९८७ या दिवशी, म्हणजे वर्ष १९८३ पासून ४ वर्षे साधना केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मध्यप्रदेशमधील इंदूर येथील संत प.पू. भक्तराज महाराज हे ‘गुरु’ म्हणून लाभले. ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथील प.पू. अण्णा करंदीकर यांनी डॉ. आठवले यांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी आणले. तेव्हा डॉ. आठवले हे वर्षभरापासून प.पू. अण्णा करंदीकर यांच्याकडे अध्यात्मशास्त्र शिकायला जात होते.

२. ‘संमोहन उपचारतज्ञ’ म्हणून ख्यातनाम डॉक्टर (आधुनिक वैद्य) असूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अध्यात्माकडे वळण्याचे कारण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अध्यात्माकडे वळण्याचे कारण वैशिष्ट्यपूर्ण होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष १९६४ मध्ये वैद्यकीय शिक्षण (एम्.बी.बी.एस्.) पूर्ण केल्यावर वर्ष १९६६ ते वर्ष १९७१ पर्यंत मुंबईतील विविध रुग्णालयांत नोकरी केली. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये वर्ष १९७१ ते वर्ष १९७८ पर्यंत संमोहन उपचार करत होते. वर्ष १९७८ मध्ये मुंबईत परतल्यावर त्यांनी ‘संमोहन उपचारतज्ञ’ म्हणून व्यवसायाला आरंभ केला. ते त्यांच्या क्षेत्रात ख्यातनाम डॉक्टर (आधुनिक वैद्य) होते; परंतु त्यांच्या लक्षात आले, ‘प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आपण सर्वच रुग्णांना बरे (ठीक) करू शकत नाही. वैद्यकीय क्षेत्राला मर्यादा आहे. ज्या व्याधी आधुनिक वैद्य म्हणून आपण ठीक करू शकत नाही, त्या व्याधी संत आणि महात्मे ठीक करतात.’ थोडक्यात ‘हे कोणते शास्त्र आहे ?’, याचा शोध घेण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे वर्ष १९८३ पासून संत, महात्मे, सद्गुरु यांच्याकडे जाऊ लागले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये अध्यात्मशास्त्र शिकण्याची जिज्ञासा होती. संतांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगितले, ‘अध्यात्मशास्त्र’ हा विषय बुद्धीने कळणार नाही. तो शिकायचा असेल, तर साधना केली पाहिजे.’ संतांचे आज्ञापालन करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेला आरंभ केला.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

३. साधनेमुळे आध्यात्मिक पातळी वाढू लागल्यावर सच्चिदानंद  परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामधील साधनेतील घटकांमध्ये होत गेलेले पालट

३ अ. ६१ टक्के (वर्ष १९८७, गुरुप्राप्ती) ते ७९ टक्के (वर्ष १९९५, गुरूंचा देहत्याग) आध्यात्मिक पातळीपर्यंतचा प्रवास

३ अ १. वर्ष १९८७ मध्ये गुरुप्राप्ती होणे आणि त्या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणे : या कलियुगात साधना न करणार्‍या सामान्य व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. अशी व्यक्ती ही पूर्णतः मायेमध्ये असते. साधना करून जेव्हा व्यक्ती ईश्वराशी पूर्णपणे एकरूप होते, तेव्हा तिची आध्यात्मिक पातळी १०० टक्के होते. थोडीफार साधना करून जेव्हा व्यक्ती ५० टक्के आध्यात्मिक पातळीला पोचते, तेव्हा तिचा माया आणि ईश्वर यांच्याकडे असलेला ओढा समसमान असतो. त्यामुळे तिचा साधना करण्याचा पूर्ण निश्चय अजून झालेला नसतो. साधनेमध्ये ६० टक्के आध्यात्मिक पातळीला पुष्कळ महत्त्व आहे. या पातळीला मायेचा ओढा पुष्कळ अल्प होऊन साधनेचा निश्चय झालेला असतो, तसेच त्या व्यक्तीमध्ये चैतन्य कार्यरत झालेले असते. महत्त्वाचे म्हणजे ती व्यक्ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेली असते.

साधना केल्यामुळे वर्ष १९८७ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आणि त्या वेळी त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांची गुरु म्हणून प्राप्ती झाली. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामधील भाव, अंतर्मनातील साधना आणि साधनेची तळमळ हे घटक २० ते २४ टक्के होते. सामान्य व्यक्तीमध्ये हे घटक शून्य टक्के असतात. या आध्यात्मिक पातळीला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामधील अहं १५ टक्के, म्हणजे पुष्कळ अल्प होता. सामान्य व्यक्तीमध्ये अहं २५ ते ३० टक्के असतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामधील ईश्वरप्राप्तीसाठीच्या त्यागाचे प्रमाण २५ टक्के होते; कारण गेली ४ वर्षे ते प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवार या दिवशी संतांकडे अध्यात्म शिकायला जायचे. व्यवसायाचे सुटीचे दिवसही ते सत्कारणी लावायचे. तसेच त्यांनी नामजपालाही आरंभ केला होता. हा त्यांच्या मनाचा त्याग होता. त्यांच्यामधील मायेतील कर्तव्याची ओढ १० टक्के, म्हणजे पुष्कळ अल्प होती. सामान्य व्यक्तीमध्ये ती ३० ते ५० टक्के असते. वर्ष १९८७ मध्ये नुकतीच गुरुप्राप्ती होऊनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील गुरुकृपा २५ टक्के कार्यरत होती. याचे कारण म्हणजे गेली ४ वर्षे ते संत सांगतील त्याप्रमाणे साधना करत होते. त्यामुळे त्यांच्यावर गुरुकृपा अप्रत्यक्ष कार्यरत होती.

३ अ १ अ. वर्ष १९८३ मध्ये साधनेच्या आरंभीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के असणे आणि यावरून त्यांची पूर्वजन्मीची साधना असल्याचे लक्षात येणे : वर्ष १९८३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जेव्हा विविध संतांकडे जाऊन साधनेला आरंभ केला, तेव्हा त्यांची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के होती. वर्ष १९८३ पूर्वी ते साधना करत नव्हते आणि तरीही साधनेला आरंभ करत असतांनाच त्यांची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के होती, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. यावरून लक्षात येते की, त्यांची पूर्वजन्मीची साधना होती. ‘एखाद्या व्यक्तीने मागच्या जन्मी साधना करून जेवढी आध्यात्मिक पातळी गाठलेली असते, तीच आध्यात्मिक पातळी तिच्या पुनर्जन्माच्या वेळी असते’, हा अध्यात्मातील एक नियम आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के असतांना त्यांच्यामधील भाव, अंतर्मनातील साधना, साधनेची तळमळ, त्याग इत्यादी साधनेतील घटकांचे प्रमाण १० ते १६ टक्के होते. त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यावर त्या घटकांचे प्रमाण २० ते २५ टक्के झाले. हेच ६० टक्के आध्यात्मिक पातळी होण्याचे वैशिष्ट्य आहे.

३ अ २. वर्ष १९९१ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी ७० टक्के होणे, म्हणजे त्यांना संतत्व प्राप्त होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष १९८७ ते वर्ष १९९१ अशी केवळ ४ वर्षे साधना करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळीवरून ७० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. यावरून त्यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे किती तळमळीने साधना केली, हे लक्षात येते. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

अ. प.पू. भक्तराज महाराज यांनी अखंड (२४ घंटे) नामस्मरण करायला सांगितले. डॉ. आठवले यांना अध्यात्मशास्त्राचे संशोधन करायचे असल्याने त्यांनी ‘बघूया, तर नामस्मरण करून’, असा विचार करून ते करण्यास आरंभ केला. ‘कोणतीही कृती करत असतांना चित्त नामाकडे ठेवावे’, असे गुरूंनी त्यांना सांगितले. ८ मास झाल्यावर प.पू. भक्तराज महाराज त्यांना म्हणाले, ‘‘तुमचे नाम आता अंतर्मनातून (म्हणजे सातत्याने) चालू झाले !’’

आ. सतत होत असलेल्या नामस्मरणामुळे मनाचा त्याग होऊ लागल्यावर प.पू. भक्तराज महाराज प.पू. डॉ. आठवले यांना म्हणाले, ‘‘आपला आश्रम आहे कांदळीला, तेथे सेवा करा.’’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले न चुकता प्रत्येक शनिवार-रविवार जाऊन शारीरिक कष्टाची सेवा करू लागले. अशा प्रकारे गुरूंनी त्यांच्याकडून तनाचा त्याग करवून घेतला.

इ. एक दिवस प.पू. डॉ. आठवले यांनी प.पू. भक्तराज महाराजांना म्हटले, ‘‘गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला द्यायला माझ्याकडे केवळ चिकित्सालयाची वास्तू तेवढी आहे. मी ती तुम्हाला अर्पण करतो.’’ तेव्हा प.पू. भक्तराज महाराज म्हणाले, ‘‘चिकित्सालयाच्या प्रत्येक गुरुवारच्या उत्पन्नाचा चौथा भाग मला द्या.’’ अशा प्रकारे प.पू. डॉ. आठवले यांच्याकडून धनाचा त्याग झाला.

अध्यात्मात त्यागाला अत्यंत महत्त्व आहे. तन, मन आणि धन या तीनही गोष्टींचा त्याग हवा. या त्यागाविना सद्गुरुप्राप्ती शक्य नाही.

३ अ २ अ. संतपदी असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील साधनेतील घटकांचे प्रमाण : प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉ. आठवले यांना अहं-निर्मूलन करणे, ईश्वरेच्छेने वागणे इत्यादी साधनेतील पैलू शिकवले. यामुळे प.पू. डॉ. आठवले यांच्यामधील भाव, अंतर्मनातील साधना, साधनेची तळमळ, त्याग इत्यादी साधनेतील घटकांमध्ये ५ – ६ टक्क्यांनी वाढ होऊन ते साधारण २९ टक्के झाले. विशेष म्हणजे त्यांच्यातील आनंद आणि व्यापकत्व यांच्या टक्केवारीमध्ये साधारण १० टक्क्यांनी वाढ झाली. तसेच त्यांच्यातील अहं आणि मायेतील कर्तव्याची ओढ यांचे प्रमाण अनुक्रमे ११ टक्के अन् ६ टक्के इतके घटले.

३ अ २ आ. साधनेमुळे आनंदावस्था अनुभवता यायला लागल्यावर गुरूंकडून शिकायला मिळालेला एक प्रसंग : तेव्हाचा एक प्रसंग म्हणजे साधनेमुळे आनंदावस्था अनुभवता यायला लागल्यावर एक दिवस प.पू. डॉ. आठवले प.पू. भक्तराज महाराज यांना म्हणाले, ‘‘आता यापुढे मी तुम्हाला (अध्यात्मातील) एकही प्रश्न विचारणार नाही. (जिज्ञासेमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांना अनेक प्रश्न विचारून अध्यात्मातील अनेक विषयांच्या संदर्भात शंकानिरसन करून घेत.)’’ तेव्हा ते प.पू. डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ रागावले. ‘जिज्ञासू हाच ज्ञानाचा अधिकारी आहे !’, हे यातून त्यांनी शिकवले. गुरूंच्या आज्ञापालनामुळे प.पू. डॉ. आठवले यांच्यावरील गुरुकृपा ४० टक्के झाली. तेव्हा प.पू. भक्तराज महाराज प.पू. डॉ. आठवले यांच्या संदर्भात म्हणू लागले, ‘हा जीवनमुक्त आहे !’

३ अ ३. वर्ष १९९५ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी ७९ टक्के होणे : १७ नोव्हेंबर १९९५ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांनी देहत्याग केला. तोपर्यंत त्यांचे शिष्य प.पू. डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी ७९ टक्के झाली होती. वर्ष १९९१ मध्ये ७० टक्के आध्यात्मिक पातळी असलेले प.पू. डॉ. आठवले हे पुढील ४ वर्षांत ७९ टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत जलद गतीने पोचले. याचे कारण म्हणजे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी जे जे सांगितले, ते ते प.पू. डॉ. आठवले यांनी लगेच केले.

३ अ ३ अ. गुरूंचे आज्ञापालन केल्याने समष्टी साधनेत पुढे पुढे जाणे

१. अध्यात्मप्रसाराठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी १.८.१९९१ या दिवशी ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ स्थापन केली.

२. वर्ष १९९२ मध्ये ‘अध्यात्माचा प्रसार महाराष्ट्रभर करा’, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितले.

३. वर्ष १९९३ मध्ये ‘आता भारतभर अध्यात्माचा प्रसार करा’, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितले.

४. वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज प.पू. डॉ. आठवले यांना म्हणाले, ‘‘डॉक्टर, आता आठवड्यात एकच दिवस रुग्णांना बघा.’’ त्यांचे आज्ञापालन करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्वतःचे चिकित्सालय आठवड्यातील एकच दिवस चालवू लागले आणि बाकीचे ६ दिवस अध्यात्मप्रसार करू लागले.

५. शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी वर्ष १९९४ मध्ये ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती केली.

वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज प.पू. डॉ. आठवले यांना म्हणाले, ‘‘डॉक्टर, तुम्ही आम्हाला तन-मन-धन दिले. आम्ही तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले.’’ ‘ज्ञान, भक्ती आणि वैराग्य’ यांचा अर्थ आहे, ‘ज्ञानयोग, भक्तीयोग आणि वैराग्य, म्हणजे कर्मफळाची अपेक्षा न करता कर्म करण्यास शिकवणारा कर्मयोग.’  याचाच अर्थ प.पू. भक्तराज महाराज यांनी ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग एकत्रित असणारा ‘गुरुकृपायोग’ तेव्हाच शिकवला.

६. स्वतःचे चिकित्सालय बंद करून वर्ष १९९४ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे पूर्णवेळ गुरुकार्य (अध्यात्मप्रसार) करू लागले.

७. पुढे वर्ष १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितले, ‘आता अध्यात्माचा प्रसार जगभर करा.’

अशा प्रकारे प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉ. आठवले यांना समष्टी साधनेत पुढे पुढे नेले.

३ अ ३ आ. गुरूंनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना कसे घडवले, याची काही उदाहरणे

१. मायेची ओढ नष्ट करण्यासाठी (घरातील माणसांपासून विरक्ती येण्यासाठी) प.पू. भक्तराज महाराज प.पू. डॉ. आठवले यांना दिवाळीला त्यांच्याकडे बोलवत.

२. प.पू. भक्तराज महाराज यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘गुरूंच्या सगुण देहाच्या ओढीपेक्षा (त्यांच्याकडे जाण्यापेक्षा) गुरुकार्य महत्त्वाचे’, हे शिकवले आणि नंतर त्याउलट ‘गुरुकार्यापेक्षा गुरुचरण महत्त्वाचे’, हेही शिकवले. (गुरूंनी पातळी आणि आवश्यकता यांनुसार शिकवले.)

३. प.पू. डॉ. आठवले यांनी वर्ष १९९२ ते वर्ष १९९५ या काळात प.पू. भक्तराज महाराज यांना अध्यात्माविषयीचे सहस्रो प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. अशा प्रकारे ते गुरूंकडून शिकले.

३ अ ३ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील वाढलेले साधनेतील घटक : अशा प्रकारे केलेले आज्ञापालन, साधनेतील तळमळ, जिज्ञासा यांमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील भाव, अंतर्मनातील साधना, साधनेची तळमळ, त्याग, आनंद, प्रीती आणि व्यापकत्व हे गुण साधारण २९ टक्क्यांवरून साधारण ३५ टक्क्यांपर्यंत पोचले. सध्या कलियुगात साधना करणार्‍या व्यक्तीमधील साधनेतील घटकांचे प्रमाण अधिकाधिक ३० टक्के असू शकते; कारण सध्या सामान्य व्यक्तीची कुवत तेवढीच आहे. या तुलनेत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील साधनेतील घटकांचे प्रमाण त्याहून अधिक झाले, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांच्यातील अहं आणि मायेतील कर्तव्याची ओढ हे घटक अनुक्रमे ५ टक्के आणि ४ टक्के असे अत्यल्प झाले. यामुळेच १५.५.१९९५ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज प.पू. डॉ. आठवले यांना म्हणाले, ‘‘तुम्ही मेलेलेच (तुमची ‘मी’पणाची जाणीव नष्ट झाली आहे.) आहात !’’

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या टप्प्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील गुरुकृपा ५० टक्के, म्हणजे सर्वाेच्च झाली. हे प्रमाण सर्वाेच्च आहे; कारण उर्वरित ५० टक्के गुरुकृपा ही निर्गुणातील, म्हणजे अव्यक्त गुरुकृपा आहे.

३ अ ३ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे असामान्य व्यक्तीमत्त्व : आतापर्यंतच्या साधनेतील वाटचालीमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामधील साधनेतील सर्वच घटकांची टक्केवारी ३५ टक्क्यांपर्यंत पोचली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे; कारण सामान्य व्यक्तीमध्ये काही गुण असतात आणि काही नसतात. याउलट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामधील सर्वच गुणांमध्ये वाढ झाली. याचा अर्थ ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे सर्वगुणसंपन्न असे असामान्य व्यक्तीमत्त्वाचे आहेत’, हे लक्षात येते !

(क्रमशः)

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.५.२०२४)

भाग २. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/797736.html