सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्या त्या त्या वेळच्या छायाचित्रावरून त्यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास

२६ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण वर्ष १९८३ ते वर्ष १९९५ या कालावधीतील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास जाणून घेतला. आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्या त्या त्या वेळच्या छायाचित्रावरून त्यांच्यातील साधनेच्या घटकांचा अभ्यास केला आहे. आजच्या या लेखात वर्ष १९९९ ते वर्ष २०२२ या कालावधीतील त्यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास मांडला असून वर्ष १९९९, वर्ष २०१० आणि वर्ष २०२२ मधील त्यांची छायाचित्रे दिली आहेत. (छायाचित्रे ओळीने पहावीत)

    

(भाग २)

भाग १. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/797421.html


३ आ. ८४ टक्के आध्यात्मिक पातळी (वर्ष १९९९) ते ‘सच्चिदानंद परब्रह्म’ (वर्ष २०२२) या उपाधीपर्यंतचा प्रवास

३ आ १. वर्ष १९९९ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी ८४ टक्के असणे, म्हणजे ते ‘सद्गुरु’पदी विराजमान असणे : ‘सद्गुरु’ या पदाचे वैशिष्ट्य म्हणजे आनंद ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले या आध्यात्मिक पातळीला पोचल्यावर त्यांच्यातील आनंदाचे प्रमाण ४० टक्के झाले, तसेच त्यांच्यामधील साधनेची तळमळ, त्याग, प्रीती आणि व्यापकत्व यांचे प्रमाणही ४० टक्के झाले. या पातळीला त्यांच्यावरील मायेचा प्रभाव ० टक्के झाला. वर्ष १९९५ मध्ये ७९ टक्के आध्यात्मिक पातळीवर असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वर्ष १९९९ मध्ये ८४ टक्के आध्यात्मिक पातळीवर पोचण्याचे कारण म्हणजे त्यांनी आरंभलेले व्यापक अध्यात्मप्रसाराचे कार्य ! या कार्याची तोंडओळख पुढे दिली आहे, तसेच हे कार्य होण्यासाठी प.पू. भक्तराज महाराजांनी त्यांना आधीच कसे घडवले होते, हेही येथे दिले आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

३ आ १ अ. आरंभलेले व्यापक अध्यात्मप्रसाराचे कार्य

१. २३ मार्च १९९९ या दिनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली.

२. वर्ष १९९६ ते वर्ष १९९८ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये ठिकठिकाणी, तसेच कर्नाटक राज्यामध्ये मराठी भाषिक असलेल्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी लोकांना साधना करण्याचे महत्त्व सांगितले, तसेच त्यांनी लोकांमध्ये धर्माभिमान जागृत केला. सभेनंतर ते साधना करण्यास उत्सुक असणार्‍या जिज्ञासूंशी संवाद साधायचे आणि त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करायचे. मुख्य म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील ‘प्रीती’ या गुणामुळे जिज्ञासू आपलेसे व्हायचे. यामुळे अनेक जण त्यांच्याशी कायमचे जोडले गेले आणि ते साधना करू लागले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वाणीतील चैतन्याचा प्रभाव लोकांवर पडत असे. जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंचे सत्संग साधकांकडून प्रत्येक आठवड्याला घेतले जात. अशा रितीने जिज्ञासूंची साधना आरंभ झाली आणि सनातन संस्थेचा साधक परिवार वाढत गेला.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मप्रसार आणखी प्रभावी होण्यासाठी वर्ष १९९८ मध्ये ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ आणि वर्ष १९९९ मध्ये ‘दैनिक सनातन प्रभात’ प्रसिद्ध करणे चालू केले. यामध्ये ते अध्यात्म कृतीमध्ये आणण्यासाठी लिखाण प्रसिद्ध करू लागले, तसेच ते राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध करून ‘त्यांमधून लोकांनी काय दृष्टीकोन घ्यायचा ?’, हे शिकवू लागले. अशा प्रकारे त्यांनी सनातन प्रभातमधून लोकमन घडवण्यासाठी आणि ते साधनेसाठी प्रवृत्त होण्यासाठी लोकांना जे आवश्यक आहे, तेच दिले.

४. अध्यात्मप्रसार, धर्मजागृती आणि राष्ट्रजागृती करतांना रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे त्यांनी ध्येय ठेवले आणि ते सर्वांना सांगितले.

३ आ १ आ. आतूनच सर्व कळेल आणि अध्यात्मातील अधिकारी बनतील, असे प.पू. भक्तराज महाराजांनी घडवले असणे : १७ नोव्हेंबर १९९५ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांनी देहत्याग केला. असे असूनही प.पू. डॉ. आठवले यांची त्यापुढील अध्यात्मातील वाटचाल जलद गतीने होण्याचे कारण म्हणजे प.पू. भक्तराज महाराजांनी दिलेली पुढील शिकवण !

१. ‘दिसेल ते कर्तव्य आणि घडेल ते कर्म’, अशी वृत्ती सतत ठेवावी.

२. शिष्याला गुरुच आतून स्फूर्ती देतात किंवा सांगतात, हे प.पू. भक्तराज महाराजांनी प्रत्यक्ष प्रसंगांतून शिकवलेले असणे.

३. शिष्याने ‘मी केवळ एक माध्यम आहे. माझ्यातून गुरुच शिकवणार आहेत’, असा भाव सतत ठेवावा.

४. ‘गुरूंना सर्वस्व अर्पण केल्यावर ‘आपल्या मनात येणारा विचार आपला आहे’, हेही वाटून उपयोगी नाही.

५. प.पू. डॉ. आठवले यांना ध्यानात प्रश्नांची उत्तरे मिळायची. एकदा प.पू. भक्तराज महाराज म्हणाले, ‘‘द्वैतात का रहाता ? प्रश्न विचारणारा आणि उत्तरे देणारा, असे कशाला ? तुमचे उत्तर तुम्हालाच कळते. तेव्हा आता ध्यानात प्रश्न न विचारता काय वाटते, ते सांगा.’’ (गुरूंनी अद्वैताकडे जाण्यास शिकवले.)

अशा प्रकारे प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉ. आठवले यांना ‘गुरु अंतर्यामीच आहेत’, हे लक्षात आणून दिले आणि त्यांना अध्यात्मातील अधिकारी बनवले.

३ आ २. वर्ष २०१० मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी ९१ टक्के होणे, म्हणजे ते ‘परात्पर गुरु’ या पदी विराजमान असणे : ‘परात्पर गुरु’ या पदाचे वैशिष्ट्य म्हणजे शांती ! तसेच सर्वज्ञता, सर्वशक्तीमानता आणि सर्वव्यापकता हेही गुण त्याबरोबर आलेच. यामुळे वर्ष २०१० मध्ये या पदाला पोचल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये ‘व्यापकत्व’ हा गुण ५० टक्के, म्हणजे सर्वाेच्च प्रमाणात झाला, तसेच अन्य सर्व गुणांचे प्रमाण ४० ते ४५ टक्के झाले.

मागील ११ वर्षांत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य आणखी व्यापक आणि जगभर होऊ लागले होते. जणू त्यांच्यामध्ये अवतारी तत्त्व कार्यरत झाले. त्यांच्या कृपेच्या छायेखाली वेगवेगळे समष्टी कल्याणकारी कार्य आरंभ झाले, तसेच साधकांच्या साधनेतील उन्नतीचा चढता आलेखही दिसून आला. हे कार्य पुढील माध्यमांतून झाले.

अ. अध्यात्म, तसेच राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील ग्रंथांचे केलेले संकलन. (एप्रिल २०२४ पर्यंत एकूण ३६५ ग्रंथांची निर्मिती झाली आहे. या ग्रंथांच्या भारतीय आणि विदेशी मिळून १३ भाषांत ९६ लाख ५४ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत.) २००० हून अधिक ग्रंथ प्रकाशित करता येतील, एवढ्या लिखाणाचा संग्रह असल्याने ग्रंथनिर्मितीचे कार्य चालूच आहे.

आ. शीघ्र ईश्वरप्राप्ती करवून देणार्‍या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामुळे अनेक साधकांची उल्लेखनीय अशी आध्यात्मिक उन्नती होत आहे. (१५ मे २०२४ पर्यंत १२७ साधक संत झाले असून १ सहस्र ५८ साधक संतपदाकडे वाटचाल करत आहेत.)

इ. वर्ष २००० ते वर्ष २००२ या कालावधीत राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील ११० हून अधिक संतांच्या भेटी घेतल्या. काही ठिकाणी संतबैठका, सर्वसंप्रदाय सत्संग, सर्वधर्म सभा इत्यादी आयोजित केले.

ई. धर्मशिक्षण देणार्‍या ३७० ध्वनीचित्र-चकत्यांची, तसेच हिंदु धर्म, संस्कृती, संत, आध्यात्मिक स्थळे इत्यादींचे माहात्म्य विशद करणार्‍या सहस्रो लघुपटांची निर्मिती करण्यात आली.

उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली संघटना

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे, राष्ट्रव्यापी हिंदूसंघटन करणे आदींसाठी कार्यरत असलेली ‘हिंदु जनजागृती समिती’ (स्थापना : ७.१०.२००२)

ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना राष्ट्र आणि धर्म कार्यांच्या अंतर्गत विविध सेवा उपलब्ध करून दिल्या, त्या सेवा साधकांना शिकवल्या, तसेच साधकांकडून सेवेत होणार्‍या चुका त्यांना वेळोवेळी सांगून त्यांवर योग्य दृष्टीकोनही दिले. अशा प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समष्टी कार्य करणारे संत आणि शेकडो साधक घडवले. हे सर्व जण आज गुरूंचे कार्य सक्षमपणे पुढे नेत आहेत.

३ आ ३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी वर्ष २०१६ मध्ये ९३ टक्के असणे आणि त्यानंतर वर्ष २०२१ मध्ये ती ९४ टक्के होणे

३ आ ३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी वर्ष २०१० ते वर्ष २०२१ या कालावधीमध्ये केवळ ३ टक्क्यांनी वाढण्याचे मुख्य कारण वाईट शक्तींची आक्रमणे, हे असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची वर्ष २०१० मध्ये असलेली ९१ टक्के आध्यात्मिक पातळी आणखी ६ वर्षांनी (वर्ष २०१६ मध्ये) केवळ २ टक्क्यांनी वाढून ती ९३ टक्के झाली, तसेच पुढे वर्ष २०१६ ते वर्ष २०२१ या कालावधीमध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी केवळ १ टक्क्याने वाढून ती ९४ टक्के झाली. यावरून लक्षात येते की, ‘परात्पर गुरु’ पदाला आल्यावर पुढे आध्यात्मिक उन्नती होणे किती कठीण असते. याची २ कारणे आहेत.

पहिले कारण, म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याचा तो टप्पा असल्याने तो साध्य करणे पुष्कळ अवघड आहे. ईश्वराशी एकरूप होणे म्हणजे सर्वगुणसंपन्नता हवी, तसेच सर्व जगताची काळजी वहाण्याची कुवत हवी. दुसरे कारण, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘रामराज्याची स्थापना करणे’, हे ध्येय असल्याने सप्तपाताळांतील बलाढ्य वाईट शक्तींना विरोध करणे आणि त्यांची आक्रमणे झेलून पुढे मार्गक्रमण करणे आले. या सूक्ष्मातील युद्धामुळेही आध्यात्मिक प्रगतीचा वेग मंदावतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात दुसरे कारण अधिक लागू पडते, हे त्यांच्यावरील वाईट शक्तींच्या आक्रमणांवरून लक्षात येते.

३ आ ३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वाईट शक्तींची आक्रमणे झेलून जगभर समष्टी कार्य करणे चालूच ठेवणे आणि त्यामुळे त्यांच्यातील त्याग, आनंद, प्रीती अन् व्यापकत्व हे गुण ५० टक्के, म्हणजे सर्वाेच्च स्तरावर पोचणे : वाईट शक्तींची आक्रमणे झेलून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जगभर अध्यात्माचा प्रसार करणे चालूच ठेवल्याने जगातील अनेक जण साधनारत झाले आहेत, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रयत्नांमुळे रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचा उद्घोष आता अनेक हिंदुत्वनिष्ठ संस्था आणि अनेक जण उघडपणे करू लागले आहेत. यासाठीची चळवळ आता सक्रिय झाली आहे. या समष्टी कार्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी वर्ष २०२१ मध्ये ९४ टक्के झाली. या पातळीला त्यांच्यातील त्याग, आनंद, प्रीती आणि व्यापकत्व हे गुण ५० टक्के, म्हणजे सर्वाेच्च स्तरावर पोचले, तसेच अन्य गुणही त्या सर्वाेच्च स्तराच्या जवळ पोचले.

३ आ ३ इ. वर्ष २०१० ते वर्ष २०२१ पर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने झालेली काही वैशिष्ट्यपूर्ण समष्टी कार्ये

१. वाईट शक्तींच्या संदर्भातील संशोधन आणि शारीरिक, मानसिक, तसेच वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपायपद्धतींविषयी संशोधन

२. ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ याविषयी मार्गदर्शन आणि संगीत, नृत्य इत्यादी कलांचे सात्त्विक सादरीकरण करण्याविषयी संशोधन

३. हिंदूंच्या धार्मिक कृती, तसेच सूक्ष्म पंचमहाभूतांमुळे घडणार्‍या बुद्धीअगम्य घटना यांचे वैज्ञानिक उपकरणे (उदा. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’) आणि तंत्रज्ञान (उदा. ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी’) यांद्वारे संशोधन

४. मे २०२४ पर्यंत २ बालक-संतांची, तसेच ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या २५० अन् अन्य ९२५ दैवी बालकांची (‘स्वर्ग’ आणि ‘महर्’ या उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या मुलांची) ओळख समाजाला करून दिली आहे. दैवी बालकांविषयी संशोधनही चालू आहे.

५. सर्वव्यापी अध्यात्मशास्त्राचे, तसेच ईश्वरप्राप्तीचे शिक्षण देणारे विद्यापीठ जगाला देण्यासाठी आणि जगभर अध्यात्माच्या प्रसारासाठी २२.३.२०१४ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना केली. सध्या या विश्वविद्यालयाच्या वतीने आध्यात्मिक कार्यशाळांचे आयोजन करणे; चित्रकला, संगीत इत्यादी कलांचे ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने शिक्षण देणे इत्यादी कार्य चालू आहे.

६. ‘देशभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या संघटनातूनच हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य होऊ शकते. यासाठी भारतभरातील राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्रित करणारे व्यासपीठ असावे’, असा विचार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्वप्रथम मांडला. या विचारांतून प्रेरणा घेऊन ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ संयुक्तपणे वर्ष २०१२ पासून प्रतिवर्षी गोवा येथे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ (आताचे नाव ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’), तर अन्यत्र राज्यस्तरीय अन् जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशने आयोजित करत आहेत.

७. ‘सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्या आणखी वाढतील. कोरोना महामारीचा सामना सर्व जगालाच करावा लागला. जगातील काही देश एकमेकांशी लढत आहेत. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धाचे सावटही सर्वांवर आहेच. ‘आगामी तिसर्‍या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील’, असे काही संतांचे भाकीत आहे. भावी तिसर्‍या महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध होणार नसतांना प्रत्येकाला स्वतःच स्वतःवर उपचार करता येणे आवश्यक ठरते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विविध उपचारपद्धतींविषयीची ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका संकलित करणे आरंभ केले. या ग्रंथमालिकेत मे २०२४ पर्यंत २५ ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. या ग्रंथांच्या आधारे बनवलेले लेख ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतून प्रसिद्ध करण्यात येत असून ते http://sanatan.org  या संकेतस्थळावरही ठेवले जातात.

एवढे व्यापक स्तरावर आणि सर्व अंगांनी विचार करणारे, सर्व स्तरांवर कार्य करणारे, सर्वांना समष्टी कार्यामध्ये सामावून घेणारे असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीयच आहेत !

३ आ ४. वर्ष २०२२ मध्ये सप्तर्षींनी ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी देणे : ‘जेथे दिव्यत्व असते, तेथे प्रचीती असते’, या सिद्धांतानुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये त्यांच्यातील दैवीपणाची प्रचीती देतात. सप्तर्षी जीवनाडीपट्टी-वाचनाच्या माध्यमातून सप्तर्षींनीही अनेकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले आहेत.

३ आ ४ अ. नाडीभविष्यामध्ये सप्तर्षींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे केलेले गुणगान : नाडीभविष्य हे एक प्रगल्भ ज्योतिषशास्त्र आहे. थोर महर्षींनी सहस्रो वर्षांपूर्वी नाडीपट्ट्यांमध्ये लिखाण करून ठेवले आहे. ते लिखाण जाणून तमिळनाडूमधील पू. डॉ. ॐ उलगनाथन्, श्री. सेल्वम् गुरुजी इत्यादी नाडीपट्टीवाचक विविध घटनांचे भविष्य, तसेच काही धार्मिक विधी सांगतात.

मे २०१५ मध्ये प्रथम पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी जीवनाडीपट्टी-वाचन केले. तेव्हापासून आतापर्यंत (मे २०२४ पर्यंत) साधारण ३०० वेळा विविध नाडीपट्टीवाचकांनी सनातन संस्थेसाठी नाडीभविष्याचे कथन केले आहे. त्यामध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे एकमेव असे गुरु हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत आहेत’, असे अनेकदा सांगितले आहे. तसेच नाडीभविष्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांचे अवतारत्व, त्यांचे कार्य इत्यादींची माहिती आली आहे. ‘सप्तर्षी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काय म्हणतात ?’, याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘सनातन धर्म’स्वरूप आहेत. ‘सनातन धर्मा’ची उत्पत्ती ही परम गुरुजींपासून (परात्पर गुरु डॉक्टरांपासून) झाली आहे.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी-वाचनाच्या माध्यमातून, २४.५.२०१७)

२. ‘महर्षि व्यास यांनी वेदांचे महत्त्व जगापुढे आणले. तेच कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत. त्यांना महर्षि व्यास यांचा आशीर्वाद आहे.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी-वाचनाच्या माध्यमातून, १५.६.२०१६)

३. ‘राजा भगीरथाने ज्या प्रकारे ‘भगीरथ प्रयत्न’ करून गंगेला भूतलावर आणले, तसेच परम गुरुजींनी केलेल्या ‘भगीरथ प्रयत्नां’मुळे ‘हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य)’ येणारच आहे.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी-वाचन क्रमांक ७५, चंदीगड, १५.६.२०१६)

४. ‘प.पू. डॉक्टरांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) देह असेल, तरच ‘हिंदु राष्ट्र’ येऊ शकते. त्यांचा देह आणि ‘हिंदु राष्ट्र’ काही वेगळे नाही !’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी-वाचनाच्या माध्यमातून, २८.५.२०१७)

५. ‘परम गुरुजींची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) जन्मकुंडली आणि राष्ट्राची कुंडली यांत काहीही भेद नाही.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी-वाचनाच्या माध्यमातून, २८.५.२०१७)

३ आ ४ आ. सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’, असे संबोधण्यास सांगणे : १३.७.२०२२ पासून ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’च्या वाचनाच्या माध्यमातून सप्तर्षींनी आज्ञा केल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’, असे संबोधण्यात येत आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म’ या उपाधीच्या संबोधनाद्वारे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील ईश्वरी तत्त्वाचा सर्वांना लाभ व्हावा’, हा सप्तर्षींचा या आज्ञेमागील उद्देश आहे. सप्तर्षींनी सांगितलेले किती योग्य आहे, हे सारणीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले हे वर्ष २०२२ मध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म’ या स्थितीला पोचले, तेव्हा त्यांच्यामधील साधनेतील घटकांच्या दिलेल्या टक्केवारीतून लक्षात येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या साधनेतील प्रत्येक घटकच आता ५० टक्के, म्हणजे सर्वाेच्च प्रमाणात आहे. त्यातील उर्वरित ५० टक्के भाग हा निर्गुणाचा आहे. याचाच अर्थ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे आता ‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद’ या स्थितीला आहेत.

४. सारांश सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात दिलेल्या २ सारण्यांमधून पुढील गोष्टी लक्षात येतात.

अ. एखाद्या जिवाची आध्यात्मिक उन्नती होत जाते, तेव्हा त्याच्या बाह्य रूपावरून सामान्य व्यक्तीला त्याच्यातील भेद कदाचित लक्षात येणार नाही; पण सूक्ष्मातून जाणणार्‍याला त्याच्यातील पालट लक्षात येतात. उन्नती होत असलेल्या जिवाचे सुंदरता, गोडवा, चैतन्य, आनंद इत्यादी घटक लक्षात येतात.

आ. या बाह्य लक्षणांव्यतिरिक्त उन्नती होत असलेल्या जिवाची गुणवैशिष्ट्येही वृद्धींगत होत जातात, हे लक्षात येते.

इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात केलेल्या अभ्यासातून प्रत्येक आध्यात्मिक पातळीला ते घटक (उदा. भाव, अंतर्मनातील साधना, साधनेची तळमळ, त्याग इत्यादी) साधारण किती टक्के असू शकतात, याचे अनुमान आपल्याला काढता येते, उदा. ६० टक्के पातळीला १५ ते २० टक्के, ७० टक्के पातळीला २५ ते ३० टक्के, ८० टक्के पातळीला ३० ते ३५ टक्के, ९० टक्के पातळीला ४० ते ४५ टक्के इत्यादी, तसेच त्या जिवातील अहंचे प्रमाणही कसे अल्प होत जाते, हे लक्षात येते.

ई. त्या जिवाचे समष्टी कार्य जेवढे व्यापक, तेवढी त्याची सर्वांगीण उन्नती होते, हेही लक्षात येते.

५. कृतज्ञता

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी जिवाचा अभ्यास मला त्यांच्या छायाचित्रांवरून करता आला, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(समाप्त)

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.५.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या http://goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या / संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक