रामनाथी आश्रमात राहून साधना करण्याची ओढ असलेली फोंडा (गोवा) येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. याज्ञी वसंत सणस (वय १२ वर्षे) !

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. याज्ञी वसंत सणस हिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे.’ – संकलक)

वैशाख कृष्ण चतुर्थी (२७.५.२०२४) या दिवशी फोंडा (गोवा) येथील कु. याज्ञी सणस हिचा १२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आई-वडिलांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. याज्ञी सणस

कु. याज्ञी सणस हिला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सौ. स्वाती वसंत सणस

१. देवतांची पुस्तके वाचण्याची आवड असणे : ‘याज्ञीला वाचनाची फार आवड आहे. ती नेहमी देवतांचीच पुस्तके वाचते आणि दुकानातून इतर पुस्तके न घेता केवळ देवतांचीच पुस्तके घेण्याचा हट्ट करते. पुस्तके किंवा ग्रंथ वाचून झाल्यावर ती ते घरातील इतरांना वाचून दाखवते किंवा त्यांतील गोष्टी इतरांना सांगते.

२. सात्त्विकतेची ओढ : आम्ही २ वर्षे (वर्ष २०२२ ते वर्ष २०२४) मुंबईत रहात असतांना याज्ञीला शाळेतील मुलींशी मैत्री करणे, तसेच त्यांच्याशी खेळणे आवडत नसे. रामनाथी आश्रमात आल्यावर अनेक बालसाधिका तिच्या मैत्रिणी झाल्या. याज्ञी त्यांच्या समवेत पुष्कळ आनंदाने खेळत असते.

याविषयी मी (आईने) याज्ञीला विचारले, ‘‘तुला आश्रमातील मैत्रिणी आणि मुंबईतील मुली यांच्यामध्ये काय फरक जाणवला ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मुंबईतील मुली साधना करत नव्हत्या. त्यांच्याकडून वेगळीच स्पंदने येत असत. आश्रमातील बालसाधिका साधना करतात.’’

३. धर्माभिमान : एकदा आम्ही याज्ञीला ‘हलाल’ उत्पादनांविषयी माहिती समजावून सांगितली होती. त्यानंतर ती दुकानात गेली की, ‘वस्तू ‘हलाल’ प्रमाणित नाही ना ?’, याची निश्चिती करून मगच ती खरेदी करते.

४. नामजपादी उपाय गांभीर्याने करणे : याज्ञी रामनाथी आश्रमात आल्यावर नामजपादी उपाय पूर्ण करण्यास प्राधान्य देते. एकदा याज्ञीने शाळेतून घरी आल्यावर आमच्या समवेत घराची सामूहिक स्वच्छता केली. ती पुष्कळ दमलेली असतांनाही ती माझ्या (वडिलांच्या) समवेत रामनाथी आश्रमात गेली आणि तिने उपाय पूर्ण केले.

५. चुकांविषयीची संवेदनशीलता : याज्ञीकडून काही चूक झाली की, ती लगेच फलकावर लिहिते आणि प्रायश्चित्त घेते. तिने घेतलेल्या प्रायश्चित्ताचे ती कठोरपणे पालन करते, उदा. तिने १५ दिवस चॉकलेट न खाण्याचे प्रायश्चित्त घेतले, तर शाळेत कोणी वाढदिवसानिमित्त चॉकलेट दिले, तरी ती ते घरी आणते, तसेच घरी शीतकपाटात चॉकलेट असले, तरी ‘मी चॉकलेट खाऊ का ?’, असेही ती कधी विचारत नाही.

६. ती आश्रमात झाडांना पाणी घालण्याची सेवा करते.

७. आश्रमात राहून साधना करण्याची ओढ

अ. एकदा मी (वडील श्री. वसंत सणस यांनी) याज्ञीला विचारले, ‘‘याज्ञी, तू साधना करण्यासाठी आश्रमात राहू शकतेस का ?’’ तेव्हा क्षणाचाही विलंब न करता याज्ञी म्हणाली, ‘‘हो चालेल. माझी सिद्धता आहे. त्यातून माझी साधनाच होणार आहे.’’

आ. एकदा मी (वडील) तिला म्हणाले, ‘‘आश्रमात सेवा आणि साधना करण्यासाठी मायेतील वस्तूंचा त्याग करावा लागेल.’’ तेव्हा तिने लगेच ‘दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम पहाणे, भ्रमणभाष आणि ‘टॅब’ वापरणे’ इत्यादी बंद केले. ती या गोष्टीसाठी हट्ट करत नाही.

८. भाव : याज्ञी परिस्थिती लगेच स्वीकारते. त्यामागे तिचा भाव असतो की, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आपल्यासाठी अन् आपल्या साधनेसाठी योग्य असेल तेच करतील.

‘प.पू. गुरुमाऊली, तुम्ही आमच्या ओंजळीत बालसाधकांच्या (आमची मुले कु. याज्ञी आणि कु. देवांश यांच्या) रूपात दोन पुष्पे टाकली आहेत. ‘या बालसाधकांना हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी सक्षम बनवता येण्यासाठी आम्हाला बळ द्या’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– श्री. वसंत सणस आणि सौ. स्वाती वसंत सणस (कु. याज्ञीचे वडील आणि आई), फोंडा, गोवा. (एप्रिल २०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.