शीख नागरिक हरदीप मलिकच्या जिवाला धोका : कॅनडा पोलिसांचा भारतावर संशय !

ओटावा – कॅनडाच्या पोलिसांनी त्यांचा एक शीख नागरिक हरदीप मलिक याच्या जिवाला धोका असल्याचे सांगत भारतावर संशय व्यक्त केला आहे. हरदीपचे वडील रिपुदमन सिंह मलिक याचीही वर्ष २०२२ मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणीही भारताच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही कॅनडाच्या पोलिसांनी केली आहे. रिपुदमन सिंह मलिक हा वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या विमानात झालेल्या भीषण बाँबस्फोटातील आरोपी आहे.

डावीकडून रिपुदमन सिंह मलिक आणि हरदीप मलिक

१. रिपुदमन सिंह याच्यावर सामूहिक हत्या आणि कट रचल्याचा आरोप आहे, ज्यात ३३१ लोक मारले गेले होते; मात्र २००५ मध्ये रिपुदमन सिंह याची आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

२. रिपुदमन सिंह मलिक याची १४ जुलै २०२२ या दिवशी सरे येथील त्याच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे भारत सरकारचा हात होता का ? याचे अन्वेषण पोलीस अधिकारी करत आहेत.

३. रिपुदमन सिंह याची पत्नी आणि इतर कुटुंबीय गेल्या आठवड्यात फ्रान्समध्ये प्रवास करत होते. या वेळी कॅनडा पोलिसांनी हरदीप मलिक याला पत्र दिले की, गुन्हेगारी कटामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

४. जून २०२३ मध्ये निज्जर याच्या हत्येपूर्वी त्यालाही असेच पत्र देण्यात आले होते.

संपादकीय भूमिका 

ऊठसूठ कुठल्याही प्रकरणात भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍या कॅनडासमवेत आता भारताने सर्व राजनैतिक संबंध तोडून त्याला धडा शिकवला पाहिजे !