इंद्रियनिग्रह

पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

साधकांपैकी ९९ टक्के व्यक्ती नीतीनियमांचे काटेकोर पालन करत असतात. किंबहुना असेही म्हणता येईल की, ज्या इमारतीचा पाया मजबूत असतो तीच पुष्कळ काळ टिकते. त्याचप्रमाणे ज्या साधनेचा पाया शुद्ध नीतीमत्तेमध्ये असतो, तेच शेवटपर्यंत यश देत जाते. सामान्य मनुष्य सदाचारी असो वा दुराचारी असो, त्याच्यावर इंद्रियांचा प्रभाव सारखाच चालतो. म्हणून त्यातून सुटण्यासाठी साधकाने मनापासून भगवंताची प्रार्थना करणे आवश्यक आहे. जे मानसिक बळ आपल्याला इंद्रिये आवरण्यासाठी सिद्ध करते, ते आपल्या हातांतून निसटून त्या इंद्रियांनाच साहाय्य करते. याखेरीज त्यांना जितके आवरायला जावे तितकी ती अधिकच बेफाम बनतात. साधकांचे अनुभव जमेस धरून सामान्य माणसाने नुसत्या स्वतःच्या बळावर इंद्रियांना नामोहरम करू पहाणे अशक्य नसले, तरी दुरापास्त आहे. म्हणून आपण एकीकडे इंद्रिये आवरण्याचा प्रयत्न करत असतांना दुसरीकडे भगवंताच्या नामाला घट्ट धरून प्रतिदिन त्याची पुन्हा पुन्हा प्रार्थना केली पाहिजे. असे जो करील, त्याला हळूहळू भगवंताच्या कृपेचा अनुभव येऊन इंद्रियनिग्रहाची शक्ती प्राप्त होईल आणि एकदा का इंद्रियनिग्रह साध्य झाला की, मग भगवंताच्या ध्यानात मन गुंतवणे सोपे जाईल.

– पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

(साभार : ‘उपनिषदांचा अभ्यास’ या ग्रंथातून, संकलन : श्री. श्रीप्रसाद वामन महाजन)