पुणे – शहरातील विनाअनुमती चालू असणार्या पब, हॉटेल्स आणि रूफटॉप हॉटेलवर (इमारतीच्या छतावरील हॉटेल) महापालिकेकडून कारवाई करण्यात येते; परंतु कारवाई झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा व्यवसाय चालू केला जातो. त्यामुळे महापालिकेने अशा स्वरूपाच्या ८९ विनाअनुमती ‘रूफटॉप हॉटेल्स’ची सूची देऊन त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे केली होती. विनंती करूनही गेल्या ५ महिन्यांत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. (विनाअनुमती चालवली जाणारी ‘रूफटॉप हॉटेल्स’वर कधी कारवाई होणार ? – संपादक)
शहरातील ८९ विनाअनुमती ‘रूफटॉप हॉटेल्स’पैकी काही हॉटेल्सना नोटिसा देण्यात आल्या. त्यापैकी ५३ हॉटेल्सवर कारवाई केली गेली. ६ हॉटेलमालकांनी स्वत:हून विनाअनुमती बांधकाम काढून टाकले. ७ हॉटेल्स कायमस्वरूपी बंद करण्यात आली.
७ हॉटेलमालकांनी कारवाईला स्थगिती मिळवली आहे. ९ हॉटेल्सवर ‘महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमा’च्या कलम ५२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘पब’ची महापालिकेकडे नोंद नाही !
शहरांमध्ये मोठ्या संख्येने ‘रूफटॉप हॉटेल्स’ चालू आहेत. महापालिकेकडे केवळ ८९ हॉटेल्सची नोंद आहे. शहरांमध्ये किती ‘पब’ चालू आहेत, त्याची महापालिकेकडे नोंद नाही.
संपादकीय भूमिकासंस्कृतीचे माहेरघर असणारे पुणे अनैतिक गोष्टींमध्ये पुढे का जात आहे ? हे यावरून लक्षात येते. महापालिकाच ‘पब संस्कृती’ला वाढवत आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ! |