America not to investigate Raisi Crash : अमेरिका इराणला हेलिकॉप्टरच्या अपघाताच्या चौकशीसाठी साहाय्य करणार नाही !

रईस यांचे हात लोकांच्या रक्ताने माखले होते ! – अमेरिका

रईस

वॉशिंग्टन (अमेरिका) – हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी इराण सरकारने अमेरिकेकडे साहाय्य मागितले आहे; मात्र अमेरिकेने साहाय्य करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, मी पूर्ण माहिती देणार नाही; पण इराण सरकारने आमचे साहाय्य मागितले होते. आम्ही साहाय्य देऊ शकत नाही. न्यायाधीश आणि राष्ट्रपती या नात्याने रईसी यांच्या हाताला लोकांचे रक्त लागलेले तथ्य आम्ही पालटू शकत नाही. इराणविषयीचा आपला दृष्टीकोन पालटणार नाही. इराणच्या लोकांना त्यांच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी आम्ही पाठिंबा देत राहू.

रईसी ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, ते ‘बेल २१२’ हेलिकॉप्टर अमेरिकेने वर्ष १९६८ मध्ये बनवले आहे. वर्ष २००० मध्ये इराणने हे हेलिकॉप्टर खरेदी केले होते. याविषयी मिलर म्हणाले की, खराब हवामानात ४५ वर्षे जुने हेलिकॉप्टर उडवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला इराण सरकार उत्तरदायी आहे.